भटक्या-विमुक्तांची स्वतंत्र जनगणना न केल्यास तीव्र आंदोलन
काँग्रेस व्हीजेएनटी विभागाच्या प्रदेश अध्यक्ष ॲड.पल्लवी रेणके यांचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारने भटक्या-विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करावी, भटक्या विमुक्तांसाठी जनगणनेमध्ये डीएनटी हे स्वतंत्र कॉलम ठेवावे. या मागणीची दखल न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, असा इशारा काँग्रेस व्हीजेएनटी विभागाच्या प्रदेश अध्यक्ष ॲड.पल्लवी रेणके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये भटक्या-विमुक्त समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी विभागाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत स्वतंत्र जनगणनेचा प्रश्न संसदेत मांडण्याची ठोस मागणी करण्यात आली. केंद्र शासनाने १८ ऑगस्ट २०२० रोजी सर्व राज्यांना शहर, खेडी तसेच दुर्गम-अती दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या भटक्या-विमुक्तांचे घर ते घर सर्वेक्षण करण्याचे स्पष्ट लेखी निर्देश दिले होते. मात्र, केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असतानाही आजपर्यंत या निर्देशांची अंमलबजावणी झालेली नाही. हा भटक्या-विमुक्त समाजावर झालेला गंभीर अन्याय आहे, असे ॲड. पल्लवी रेणके म्हणाल्या.
या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केंद्र सरकारला देशातील सुमारे २५ कोटी भटक्या-विमुक्तांसाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम व कोड देण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात येणार आहे. यामुळे या प्रवर्गाची वास्तविक लोकसंख्या तसेच आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थितीची अचूक माहिती उपलब्ध होऊन त्यांना स्थिरता, शिक्षण, नोकरी आणि प्रतिष्ठेचा समान अधिकार मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्राच्या सध्याच्या अर्थसंकल्पात भटक्या-विमुक्तांसाठी कोणतीही ठोस आर्थिक तरतूद करण्यात आलेली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सरकारी नोकऱ्यांमधील संधीही नाकारल्या जात आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने अलीकडेच ११४० रिक्त पदांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत भटक्या-विमुक्तांसाठी असलेले ११ टक्के आरक्षण पूर्णपणे डावलण्यात आले. ज्या ठिकाणी १५८ पदे अपेक्षित होती, तेथे एकही जागा न दाखविल्याने आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही.
एकूणच जातनिहाय जनगणना, सर्वेक्षण, रोजगार व शासकीय नोकरीच्या संधी या सर्व स्तरांवर भटक्या-विमुक्त समाजाला सरकारद्वारा वंचित ठेवले जात आहे.या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात राज्यभर कार्यक्रम, मोर्चे व आंदोलने आयोजित करून या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यात येणार असल्याचे ॲड. पल्लवी रेणके यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस काँग्रेस व्हीजेएनटी विभागाचे सोलापूर शहर अध्यक्ष युवराज जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष बादल गायकवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश सचिव-भिमराव बंडगर, शहर कार्याध्यक्ष प्रकाश माने, शहर संघटक संजय गायकवाड, कमल चव्हाण आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment