डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच गौतम बुद्ध जयंती व वैशाखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे यंदा १ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा सोहळा यंदा २१व्या वर्षात पदार्पण करत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष “समाजभूषण” व “भिमयोध्दा” दशरथ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. “सामाजिक कार्य हाच आमचा संकल्प” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून समाजातील गरजू कुटुंबांना विवाहासारख्या मोठ्या खर्चिक विधीतून दिलासा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.
आजच्या वाढत्या महागाईच्या आणि दुष्काळजन्य परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबांना मुला-मुलींचे विवाह करताना मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावे लागते. अनेक वेळा हे कर्ज आयुष्यभराचा बोजा बनते. या पार्श्वभूमीवर सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दशरथ कसबे यांनी स्पष्ट केले. समाजातील कोणत्याही घटकावर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखी वेळ येऊ नये, तसेच प्रत्येक व्यक्तीने सन्मानाने जगावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुकुंद नगर जयंती उत्सव मंडळ, तथागत बुद्ध विहार समिती तसेच परिसरातील माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने हा सोहळा दरवर्षी यशस्वीरित्या पार पडत आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांचा सहभाग हा या उपक्रमाचा विशेष वैशिष्ट्य ठरला आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नववधू-वरांना संस्थेच्यावतीने विविध वस्तूंचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. नवऱ्यासाठी विधीचे पांढरे कपडे व सूट देण्यात येणार असून, नवरीसाठी पांढरी साडी, शालू, अडीच ग्रॅम मणीमंगळसूत्र तसेच पायातील जोडवे दिले जाणार आहेत. याशिवाय नवदांपत्याच्या संसारासाठी गोदरेज कपाट, दिवाण खाट, गादी, भांड्यांचा रॅक, विविध भांडी, प्रेशर कुकर आदी संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार आहे.
सोहळ्यात सहभागी सर्व पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून, विवाहसोहळ्याचा व्हिडिओ (सीडी) तसेच विवाह संपन्न झाल्याचे प्रमाणपत्रही वधू-वरांना देण्यात येणार आहे.
यावर्षी होणाऱ्या या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी केले आहे.
दि. 1 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत यासाठी इच्छुका वधू-वरांनी आपली नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी नगरसेवक गौतम कसबे 97 30 30 32 03, उत्तम कसबे 88 88 48 43 75, धीरज माने 9890430942, शशिकांत शिरसट 98 50 800 841 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दशरथ कसबे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस किरण डोळसे, भालचंद्र साखरे, शशिकांत शिरसट, बापूसाहेब सदाफुले, संजीव माने, खंडू वाघमारे, संघरक्षित बनसोडे, संदीप भालेराव, बुद्धप्रकाश कसबे आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment