तांबवे येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाची यात्रा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

तांबवे येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाची यात्रा

 तांबवे येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाची यात्रा





अमोल खटके पाटील यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- तांबवे येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षारंभ व गुढीपाडव्याच्या पावन शुभमुहूर्तावर पंचांगवाचन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. पंचांगवाचनानंतर नवीन वर्षातील तिथीनुसार ग्रामदैवत श्री हनुमान देवाची वार्षिक यात्रा निश्चित करण्यात आली.

पंचांगातील तिथीनुसार रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी ग्रामदैवत श्री हनुमान देवाची भव्य यात्रा आयोजित करण्यात येणार असून, सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान भरविण्यात येणार आहे. ही यात्रा तांबवे गावासाठी केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामएकता जपणारा एक महत्त्वाचा सोहळा मानली जाते.

या पंचांगवाचन कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या यात्रा कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते श्री. अमोल खटके पाटील यांची यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तांबवे गावात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तरुण आणि कार्यक्षम नेतृत्वाला संधी दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

या निवडीच्या वेळी माजी सरपंच राजाभाऊ खटके पाटील, माजी चेअरमन अशोक बाप्पा खटके पाटील, ज्येष्ठ नेते मुकुंद आण्णा खटके पाटील, माजी सोसायटी चेअरमन भजनदास नाना खटके पाटील, चेअरमन नवनाथ नाना खटके पाटील, सरपंच सचिन दादा कांबळे, माजी उपसरपंच मधुकर खटके पाटील, व्हाईस चेअरमन आप्पासाहेब खटके पाटील, यात्रा कमिटीचे सचिव विशंभर नाना गोडसे, माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ आण्णा पाटील, मेजर संजय थोरात यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी यात्रेनिमित्ताने भव्य मिरवणूक, छबिना, करमणुकीचे विविध कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भरविण्यात येणारे जंगी कुस्त्यांचे मैदान हे परिसरातील कुस्तीप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरते. नामवंत मल्लांच्या कुस्त्यांमुळे या मैदानाला मोठी गर्दी होत असते.

आजपर्यंत माजी सरपंच राजाभाऊ खटके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे यशस्वी आयोजन होत आले असून, हीच परंपरा पुढे अधिक भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नव-नियुक्त अध्यक्ष अमोल खटके पाटील हे तांबवे गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आणि लोकप्रिय तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाची यात्रा अधिक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक एकोपा जपणारी ग्रामदैवत श्री हनुमान देवाची ही वार्षिक यात्रा तांबवे गावाच्या एकतेचे व परंपरेचे प्रतीक ठरणार असून, यंदाची यात्रा विशेष उत्साहात साजरी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages