गाळे वाटपावरून उठलेल्या वादाला उत्तर; बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच – सभापती शिवाजी कापसे
कळंब(कटूसत्य वृत्त):- कृषि उत्पन्न बाजार समिती कळंब येथील ४६ गाळ्यांचे परस्पर वाटप करण्यात आल्याच्या चर्चांना अखेर बाजार समिती प्रशासनाने अधिकृत उत्तर दिले असून, "एकाही गाळ्याचे अद्याप वाटप झालेले नाही; सर्व गाळे नियमानुसार खुल्या लिलाव प्रक्रियेतूनच दिले जाणार आहेत," असे स्पष्ट विधान बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी पत्रकार परिषदेत केले.
काही दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे बाजार समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना सभापती कापसे यांनी थेट भूमिका घेत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे परस्पर निर्णय घेतलेले नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुख्य बाजार आवारातील ४६ गाळ्यांच्या बांधकामासाठी स्वारस्य अभिव्यक्ती अंतर्गत प्रस्ताव पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मान्यता मिळाल्यानंतर जाहिरात प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली; मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लिलाव प्रक्रिया पुढे ढकलावी लागली.
आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. दि. २८ फेब्रुवारी रोजी लिलाव निश्चित करण्यात आला होता; परंतु व्यापारी व इच्छुकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रक्रिया स्थगित करण्यात आली.
आता फेरलिलावाचा विषय आगामी संचालक मंडळाच्या सभेत मांडण्यात येणार असून त्यासाठी दि. १८ मार्च रोजी सभा नोटीस काढण्यात आल्याचे कापसे यांनी सांगितले. त्यामुळे गाळे परस्पर वाटप झाल्याच्या बातम्या वस्तुस्थितीपासून दूर असल्याचा दावा त्यांनी केला.
विकासकामांवर भर
बाजार समिती परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना अंतर्गत शेतकरी भवन व गाळे बांधकामाची मंजुरी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसेच सुमारे ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या रस्ते विकास कामांना अंतिम स्वरूप दिले जात असून, विद्युत तारामुक्त परिसर, वृक्षलागवड व पाणीपुरवठा योजना यांचेदेखील नियोजन सुरू आहे.
निष्क्रिय परवान्यांवर कारवाई
परवाना घेऊनही व्यवसाय न करणारे किंवा गाळा-भूखंड नसलेले सुमारे ४०० परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणतेही कर्ज न घेता बाजार समितीचा आर्थिक कारभार चालवण्यात येत असून, मागील तीन वर्षांत उत्पन्नात दरवर्षी सुमारे ८० लाख रुपयांची वाढ झाल्याचा दावा सभापतींनी केला.
उपसभापती श्रीधर भवर व संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे बाजार समिती विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, शेतकऱ्यांपर्यंत अधिक योजना पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सभापती शिवाजी कापसे यांनी स्पष्ट केले.

.jpg)
No comments:
Post a Comment