राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत नाशिकचा दबदबा; यजमान लातूर विभाग उपविजेता
कळंब (कटूसत्य वृत्त):- तालुका क्रीडा संकुल, कळंब येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागाने दमदार कामगिरी करत १७ व १९ वर्षे गटातील प्रमुख गटांत विजेतेपद पटकावले, तर यजमान लातूर विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चार दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये राज्यभरातील संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला असून अंतिम फेऱ्यांमध्ये प्रेक्षकांना रोमहर्षक सामने अनुभवायला मिळाले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ आणि धाराशिव जिल्हा हौशी आट्यापाट्या मंडळ यांच्या तांत्रिक सहकार्याने दि. २३ ते २६ मार्च २०२६ दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बक्षीस वितरण समारंभात तहसीलदार हेमंत ढोकले, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शितल शिंदे, शिल्पा डोंगरे, प्राचार्य हेमंत भगवान, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देत, प्रत्येकाने किमान एक खेळ नियमित खेळण्याचा सल्ला दिला आणि विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
अंतिम सामन्यांचे पंचकार्य धर्मेंद्र काळे, अजित भुरे, अनिकेत टकसाळ, दीपक शिंदे, सौरभ शिंदे, तुषार डोंगरे, भैरवनाथ राऊत आणि अक्षय बाकाले यांनी पाहिले, तर गुणलेखनाची जबाबदारी अक्षता मगर, वैष्णवी शिंदे, प्रिती शिंदे आणि गायत्री माळकर यांनी सांभाळली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, कैलास लटके, अक्षय बिरादार, किशोर भोकरे, निलेश माळी यांच्यासह जिल्हा आट्यापाट्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल
१४ वर्षे मुले – अमरावती प्रथम, छत्रपती संभाजीनगर द्वितीय, लातूर तृतीय
१४ वर्षे मुली – छत्रपती संभाजीनगर प्रथम, नागपूर द्वितीय, अमरावती तृतीय
१७ वर्षे मुले – नाशिक प्रथम, लातूर द्वितीय, मुंबई तृतीय
१७ वर्षे मुली – नाशिक प्रथम, लातूर द्वितीय, पुणे तृतीय
१९ वर्षे मुले – नाशिक प्रथम, लातूर द्वितीय, छत्रपती संभाजीनगर तृतीय
१९ वर्षे मुली – अमरावती प्रथम, नाशिक द्वितीय, लातूर तृतीय
कळंबमध्ये झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे तालुक्यात क्रीडा वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment