सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते व महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे सादर केले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे प्रशासकीय अंदाजपत्रक तयार केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करणे, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच नागरिकांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांसाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते विकास, आरोग्य सेवा तसेच इतर नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी अंदाजपत्रकामध्ये विविध विभागांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका तथा अध्यक्ष रोहिणी तडवळकर, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमोडे तसेच स्थायी समिती सदस्य संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, भरतसिंग बडरूवाले, बिजू प्रधाने, सतीश सिरसील्ला व सत्यनारायण गुर्रम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील नागरिकांच्या सूचना तसेच स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीनंतर आवश्यक त्या सुधारणा करून सुधारित अंदाजपत्रक जाहीर करण्यात येईल.

No comments:
Post a Comment