उष्णतेने हैराण सोलापूरकर; सहा दिवस ३९ अंशांची नोंद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदाचा मार्च महिना सोलापूर जिल्ह्यात विक्रमी उष्णतेचा ठरत असून, मागील सहा दिवसांपासून तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहिले आहे. तापमानात मोठा बदल जाणवत नसला तरी उकाड्याच्या झळा मात्र कायम जाणवत आहेत. सोमवारी दिवसभर ऊन-ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता, त्यामुळे वातावरणात काहीसा बदल जाणवला; मात्र उष्णतेत विशेष घट झाली नाही.
२७ मार्च रोजी ४०.४ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २५ ते ३० मार्चदरम्यान तापमान सातत्याने ३९ अंशांच्या आसपासच राहिले. २६ मार्चला ३९.४ अंश, २७ मार्चला ४०.४ अंश, २८ मार्चला ३९.५ अंश, २९ मार्चला ३९.२ अंश आणि ३० मार्चला ३९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
भारतीय हवामान विभाग यांच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून मिळालेल्या अंदाजानुसार ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५० टक्के, तर दुपारची आर्द्रता २८ ते ३३ टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६ ते १६ किमी इतका राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, १ व २ एप्रिल रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.png)
No comments:
Post a Comment