व्यावसायिक गॅसच्या टंचाईचा दूध बाजाराला फटका!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- व्यावसायिक वापराच्या गॅस टंचाईचा परिणाम दूध बाजारावरही होत असून, दुधाच्या मागणीत घट झाल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावरच दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराच्या गॅसच्या पुरवठ्यात टंचाई निर्माण झाली आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी चहा कॅंटीन, मेस व खानावळी अडचणीत आल्या असून, काही ठिकाणी त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी होणारी दैनंदिन दूध खरेदी कमी झाली आहे.
याचबरोबर गॅस टंचाईचा परिणाम लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांवरही झाला आहे. अलीकडील काळात समारंभांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी दुधाची मागणी घटली असून, सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिराजवळ भरणाऱ्या सुट्या दूध बाजारातही त्याचे पडसाद उमटले आहेत.
गत आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात दुधाच्या दरात प्रति फॅट एक रुपयाची घट झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर सहा ते दहा रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. वाढते तापमान, घटलेले दूध उत्पादन, चारा टंचाई आणि पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे आधीच अडचणीत असलेल्या दूध व्यवसायावर या नव्या संकटाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
मार्च महिन्यापासून दूध बाजारात मागणी वाढून दर ९ ते ९.३० रुपये प्रति फॅटपर्यंत गेले होते. मात्र गॅस टंचाई सुरू झाल्यापासून दर पुन्हा ८ रुपये प्रति फॅटपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
- राहुल शिंदे, दूध उत्पादक शेतकरी

No comments:
Post a Comment