सोलापूर (कटूसत्य वृत्त): मराठा समाज हा राज्यकर्ता समाज असून या समाजाने नेहमीच सर्व समाजाला सामावून घेत मोठ्या भावाची भूमिका पार पाडली आहे. समाजासाठी काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, तसेच प्रत्येक घटकाला संधी देण्याचे आश्वासन आम्ही पाळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सकल मराठा समाज प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने फडकुले सभागृह येथे आयोजित मराठा समाजातील १५ नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते.
यावेळी बोलताना गोरे म्हणाले की, मराठा समाज लढाऊ वृत्तीचा असून मी स्वतः या समाजात सतत कार्यरत राहिलो आहे. सोलापूर शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, पाणीपुरवठा करू शकलो नाही तर भविष्यात मत मागायला येणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माऊली पवार, गणेश देशमुख, नीलकंठ वाघचौरे, शरद ठाकरे, राजू सुपाते, दत्तामामा मुळे, नलिनी जगताप, उत्तरा बचुटे-बरडे, दिलीप कोल्हे, राजन जाधव, चंद्रकांत वानकर, शहाजी पवार, प्रवीण डोंगरे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सुनील केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नूतन नगरसेवक अमित जाधव, मृण्मयी गवळी, गणेश वानकर, विनोद भोसले, कल्पना कदम, ज्ञानेश्वरी देवकर, वैशाली भोपळे, वृषाली चालुक्य आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन दांडगे यांनी केले, तर आभार माऊली पवार यांनी मानले.
“आता मला बाहेरचा म्हणू शकत नाही”
सोलापूरचा पालकमंत्री झाल्यानंतर सुरुवातीला ‘बाहेरचा’ असल्याचा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, कामाच्या माध्यमातून मी सोलापूरकरच झालो असून आता मला बाहेरचा पालकमंत्री म्हणता येणार नाही, असा विश्वासही जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment