स्वीकृत सदस्य पदासाठी चुरस वाढली; शिंदेसेना-भाजपात इच्छुकांची गर्दी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2026

स्वीकृत सदस्य पदासाठी चुरस वाढली; शिंदेसेना-भाजपात इच्छुकांची गर्दी

 स्वीकृत सदस्य पदासाठी चुरस वाढली; शिंदेसेना-भाजपात इच्छुकांची गर्दी



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त): पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीनंतर आता स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडे केवळ प्रत्येकी एकच जागा उपलब्ध असताना इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवड प्रक्रियेत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

अक्कलकोट पंचायत समितीमध्ये एकूण १२ सदस्यांपैकी भाजपकडे ८ तर शिंदेसेना गटाकडे ४ सदस्यसंख्या आहे. शासनाने नव्याने लागू केलेल्या नियमानुसार पाच सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य अशी तरतूद असल्याने दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक सदस्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मर्यादित जागांवरून इच्छुकांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे.

भाजपकडील स्वीकृत सदस्य निवडीमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मानले जाते. तर शिंदेसेना गटाकडून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हाती निर्णयाचे सूत्र राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात अनेक इच्छुकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे भाजपसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

दरम्यान, इच्छुकांकडून पक्षपातळीवर जोरदार संपर्क आणि लॉबिंग सुरू असून, स्वीकृत सदस्य पदाची संधी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जिल्हा परिषद पातळीवरही भाजपला सात स्वीकृत जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्यापैकी अक्कलकोट तालुक्याला एक जागा मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, या संदर्भात अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

निष्ठावंतांना प्राधान्य देण्याचा शिंदेसेनेचा विचार
तालुक्यातील पहिल्याच पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याने शिंदेसेना गटात उत्साहाचे वातावरण आहे. सत्तेबाहेर असतानाही पक्षाशी निष्ठावंत राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विशेषतः चपळगाव परिसराला प्रतिनिधित्व देण्यावर भर असून, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे यांच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरू आहे.

भाजपकडून अनुभवी चेहऱ्याला संधीची शक्यता
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते परमेश्वर यादवाड यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्यांनी पंचायत समितीऐवजी जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक असल्याचेही बोलून दाखविल्याची चर्चा आहे. त्यांच्या नावाला पक्षातील काही गटांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते.

एकूणच, मर्यादित जागा आणि वाढती इच्छुकांची संख्या यामुळे अक्कलकोट पंचायत समितीतील स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरणार असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages