सांगोला (कटूसत्य वृत्त): दिवसभराच्या प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना बुधवारी सायंकाळी गारांच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. तालुक्यातील जुनोनी, उदनवाडी, झापाचीवाडी, राजुरी, वाटंबरे, कडलास आदी भागांत वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंगळवारपासूनच सांगोला तालुक्यात वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. घेरडी परिसरात मंगळवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर बुधवारी दिवसभर उष्णतेचा पारा चढलेला असतानाच सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली.
या गारपिटीमुळे आंबा, द्राक्ष, केळी या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गहू, ज्वारी यांसारख्या पिकांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी फळबागांतील फळे गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
No comments:
Post a Comment