टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाचे ठिकाणी बॅरेज होण्याकरिता खा. शिंदे यांचे निवेदन
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्यासाठी किंवा नवीन बॅरेज बांधण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या बॅरेजमुळे केवळ पाण्याची साठवणूक वाढणार नाही, तर परिसरातील १० हून अधिक गावांतील भूजल पातळीतही वाढ होईल.
या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. संबंधित बॅरेजचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी राज्य सरकारला दिले आहेत. हा प्रस्ताव प्राप्त होताच केंद्र सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर-विजापूर हायवेवरील टाकळी येथील भीमा नदीवर असलेला जुना पूल सध्या वापरात नाही. या जुन्या पुलाचे रूपांतर बॅरेजमध्ये केल्यास मोठ्या प्रमाणात जलसंचय करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण सोलापूरमधील नांदणी, टाकळी, कुरघोट, मंद्रूप, औज मंद्रूप, लवंगी या गावांसह सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या टाकळी बॅरेजच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत कुरघोटचे सरपंच बनसिद्ध बन्ने, दयानंद कलशेट्टी, संगमेश्वर बगले आणि आप्पाराव कोरे हे प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment