केळी-द्राक्ष उत्पादकांना हेक्टरी ३ लाख नुकसानभरपाईची मागणी
करमाळा (कटूसत्य वृत्त) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी व द्राक्षांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केळी व द्राक्ष उत्पादकांना हेक्टरी किमान ३ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी केली आहे.
करमाळा व माढा तालुक्यातील केळी उत्पादकांवर या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. टेंभुर्णी (ता. माढा) आणि कंदर (ता. करमाळा) येथील निर्यात केंद्रांतून पाठविण्यात आलेले सुमारे २०० कंटेनर केळी जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) येथे अडकून पडले आहेत. तसेच निर्यातदारांच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये सुमारे १ हजार मेट्रिक टन केळी साठून राहिली आहेत.
आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांकडून सध्या माल पाठवू नये, अशा सूचना देण्यात आल्याने निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या करमाळा व माढा तालुक्यात तब्बल २२ हजार मेट्रिक टन केळी तोडणीसाठी तयार आहेत, तर टेंभुर्णी, कंदर व शेलगाव परिसरातील निर्यातदारांकडे सुमारे १२ हजार मेट्रिक टन केळी शिल्लक आहेत. केळीचा निर्यात दर प्रतिकिलो १८ ते २५ रुपये असताना स्थानिक बाजारात केवळ ८ ते ९ रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संजय कोकाटे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

No comments:
Post a Comment