आ. अभिजीत पाटील यांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजी करणाऱ्यांवर अधिवेशनामध्ये उठवला आवाज
मुंबई (कटूसत्य वृत्त):- महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटींवर माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.
सर्पदंशासारख्या जीवघेण्या आजारासाठी लागणाऱ्या महागड्या इंजेक्शनचा खर्च मोठा असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती मांडली. आत्महत्येच्या प्रकरणांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात यावे, तसेच अपेंडिक्ससारख्या साध्या शस्त्रक्रियांसाठीही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयांपुरती मर्यादित असलेली ही योजना खाजगी रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे राबवली गेल्यास सर्वसामान्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळू शकतात. मात्र, सोलापूर जिल्ह्यात समन्वयक नागराज गुजरे यांच्याकडून रुग्णालयांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारीमुळे अनेक रुग्णालये ही योजना स्वीकारण्यास तयार नसल्याची बाबही निदर्शनास आणून दिली.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्पदंशासाठीचे पॅकेज वाढविणे आणि आत्महत्येच्या प्रकरणांचा योजनेत समावेश करण्याबाबत ठोस निर्णय घेण्याचीही मागणी आमदार पाटील यांनी केली.
यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देताना सांगितले, राज्याच्या या महत्वाकांक्षी योजनेत कोणतीही गैरप्रकार सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत संबंधित प्रकरणाची एक आठवड्यात चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्याचा कार्यभार काढून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment