गारपिटीचे भयंकर संकट! 7 जिल्हे संकटात, शेतकरी हवालदिल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

गारपिटीचे भयंकर संकट! 7 जिल्हे संकटात, शेतकरी हवालदिल

गारपिटीचे भयंकर संकट! 7 जिल्हे संकटात, शेतकरी हवालदिल





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. यासोबतच आजही अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

यासोबतच राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुढील काही तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत. काल राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून थंडगार हवामान झाले. त्यामध्येच आजही मोठा इशारा देण्यात आला.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासोबत पाऊस हजेरी लावेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जोरदार अवकाळी पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात गारपीट, रब्बी पिक मोठ नुकसान होण्याची शक्यता. गहू, ज्वारी, बाजरीसह फळबागायती व भाजीपाला पिकाला मोठा फटका या अवकाळी पावसामुळे बसला आहे.

सांगोला तालुक्यातील जुनोनी भागात पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर गारपिटीचा मोठा पाऊस झाला. सुमारे दीड तासाहून अधिक काळ गारपिटीचा पाऊस सुरू होता. गारपिटीच्या पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. जत तालुक्यातील डफळापूर परिसरात अवकाळी पाऊस. सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापूर येथे गारपीटाचा पाऊस झाला.

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा फळपिके यांचे नुकसान झाले आहे. जतच्या डफळापुर परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी काही ठिकाणी गारा ही पडल्या. राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग कायम असणार आहेत. त्यामध्येच अनेक भागात मोठ्या प्रमाणात गारपिट होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

चौकट-
बळीराजाची मागणी: पंचनामे तातडीने करा
निसर्गाच्या या अवकृपेमुळे सणासुदीच्या काळात शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. "दिवस-रात्र कष्ट करून पिकवलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून आता जगायचे कसे?" असा सवाल शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages