महाराष्ट्र विकायला काढलाय, राज्यभर ड्रग्स विकलं जातंय'
राज ठाकरेंची सरकारवर टीका
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मुंबईमधील शिवतीर्थ मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 'भविष्यात सत्ता हातात घेणार म्हणजे घेणार', असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
तसेच ‘महाराष्ट्र विकायला काढलाय, राज्यभर ड्रग्स विकलं जातंय, भाषेची हमी नाही, मुलांची हमी नाही हे कोणतं राज्य?’, असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“मी अनेकदा काही व्हिडीओ पाहतो, आपलेच मराठी लोक ओरडून सांगत असतात हिंदी मत बोलो, तू काय करतोय? तू हे त्याला हिंदीतच सांगतो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश बघा, केरळ बघा, गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवून आहे, आपली भाषा टिकवून आहे. पण आमच्याकडचे आमदार, खासदार हे फक्त कंत्राटदार अन् पैसे एवढंच दररोज सुरू आहे. महाराष्ट्र विकायला काढलाय”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
“आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रभर ड्रग्स विकले जात आहेत. अनेक शाळांमध्ये, कॉलेजमध्ये ड्रग्स जातायेत. सगळे तरुण-तरुणी व्यसनाधीन होत आहेत. आपण महाराष्ट्राचं काय करणार आहोत? ग्रामीण भागात विकास होत नाही, ग्रामीण भागातील आमचे तरुण-तरुणी शहरांत येतात. पण इथं शहरं बकाल पडलेली आहेत. अनेक शहरांत ड्रग्स विकलं जातंय. लहान-लहान मुलं आणि मुली पळवले जात आहेत. माझ्याकडे काही आकडेवारी आहे. गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फक्त मुंबईमध्ये ८२ मुलं बेपत्ता झाले. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नवी मुंबईत तब्बल ४९९ अपहरणाच्या घटनांची नोंद झाली”, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली.
"भविष्यात सत्ता हातात घेणार…", राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
"आज आपल्या पक्षाला २० वर्ष पूर्ण झाले आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे आज २० वर्षांनंतर १९ मार्चला गुढीपाडवा यावा, याला मी शुभसंकेतच मानतो. निवडणुका आल्या आणि गेल्या, सगळं झालं. मात्र, आपण जे उभे आहोत ते महाराष्ट्रासाठी उभे आहोत. मी आता जे बोलत आहे ते तुमच्या टाळ्या मिळाव्या म्हणून बोलत नाही. मी तुम्हाला जो शब्द दिला आहे, या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची आहे, ती सत्ता भविष्यात आपण हाती घेणार म्हणजे घेणार, हा माझा आत्मविश्वास आहे", असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
'इन्स्टाग्रामधून बाहेर या…', राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
"बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की काय बोलतोस ते महत्त्वाचं नाही, तू आज त्यांना काय दिलंस ते महत्त्वाचं आहे. समोरच्यांना विचार करायला काय दिलंस? माझ्यावर दडपण असतं की नवीन काय देऊ तुम्हाला? हे सरकार विचार करायला लागेल. आज तुम्हाला, संपूर्ण देशाला करमणुकीत गुंतवून ठेवलं. आयपीएल सुरु आहे. कुठले कुठले पिक्चर येत आहेत. मी आज तुम्हाला नम्र विनंती करणार आहे, पहिल्यांदा मोबाइलच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या. मध्यंतरी रिलबाज वगैरे आले होते. गुंतायला होतं त्यात. डान्सबार झाले त्याची लक्षणं आहेत तिथे नोटा उधळणं बंद झालं इथे हे सुरु झालं. तु्म्हाला गुंतवून ठेवायचं आणि सरकारला प्रश्न विचारु नयेत यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात नाही जगभरात सुरु आहे", असंही राज ठाकरे म्हणाले.
'आपण इराणला साथ द्यायला हवी होती', मध्य पूर्वेतील युद्धावर राज ठाकरेंचं भाष्य
राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करत देशावर ओढवलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईवर बोट ठेवलं. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी उशीर केला, असे राज ठाकरे म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे म्हणाले, "देशात आज धाकधूक असून भीषण परिस्थिती आहे. नेहमी नॉर्मलवर असणारे लोक सध्या गॅसवर आहेत. काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता. त्या इराणवर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, ते पाहता आपण इराणला साथ द्यायला हवी होती", असं राज ठाकरे म्हणाले.

No comments:
Post a Comment