शेतकऱ्यांच्या बांधावर तहसीलदार
मंगळवेढ्यात 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रम चर्चेत
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत मंगळवार आणि गुरुवारी तहसीलदार मदन जाधव हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन महसूल विषयक असलेले प्रश्न समजून घेत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महसूलच्या समस्या यामुळे सुटू लागल्याने महसूल प्रशासन सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी व महिला, निराधार व्यक्तीचा सर्वात जास्त संपर्क तहसील कार्यालयास येत असतो. त्यामध्ये वयोवृद्ध, भूमीहीन तसेच निराधार महिलांसाठी संजय गांधी योजनेचा लाभ, शिधापत्रिका व धान्यासाठी पुरवठा विभाग, नक्कल विभाग, निवडणुक संदर्भातील कामकाज देखील महसूलकडे असल्याने तालुक्यातील सर्वाधिक कामाचा ताण हा महसूल विभागाकडे येत असतो.
या सर्व धावपळीत काही कामे देखील प्रलंबित राहत असतात परंतु महसूल विभागाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर घेण्याचे निश्चित केल्यामुळे सध्या या शिबिरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न तत्काळ व जागेवर सुटू लागले. महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घेण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात केल्यामुळे महसूलचे अधिकारी तालुक्यातील आठ मंडळसह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दौरे करून शेतकरी,नागरिकांच्या महसूलच्या समस्येच्या निपटारा करण्यासाठी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन करीत असून स्वत तहसीलदार मदन जाधव हे देखील एसी दालनाच्या बाहेर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधून अडचणीचे निराकरण करत आहेत.
खुद्द तहसीलदार मदन जाधव हे देखील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शेतीविषयक महसूलकडील प्रश्न समजून घेत असल्यामुळे कनिष्ठ पातळीवर सुद्धा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये या भेटींचा सकारात्मक संदेश गेला असून कामात हयगय व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चाप बसला.फक्त कार्यालयात बसून आलेल्या नागरिकांचे आपल्या परीने योग्य ते समाधान करण्यापेक्षा त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या सोबत जेवण करून, त्यांना आपलेसे करून तहसीलदार मदन जाधव हे शेतकऱ्यांच्या मनातील भावना समजून घेत आहेत व त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांवर मार्ग काढल्याने शासनाचे सर्व कामकाज लोकाभिमुख करण्याच्या प्रक्रियेमध्ये तहसीलदार मदन जाधव यांच्या पुढाकाराने महसूल विभागाने वाळू वाटप,प्रलंबित प्रश्नाचा निपटारा,रेशन व वयोवृद्ध मानधन प्रकरणास मंजूरी दिल्याने महसूलने आघाडी घेतल्याचे दिसून येत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन भेटल्यामुळे मोकळ्यापणाने बोलतात.शिवाय त्यांच्या भाषेत सहज संवाद साधल्यास त्यांच्या नेमक्या अडचणी समजण्यास मदत होते. त्यामुळे त्यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देणे सोपे जाते. यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने दर मंगळवारी व गुरुवारी "एक दिवस बळीराजा सोबत" हे अभियान राबवले जात आहे.
- मदन जाधव (तहसीलदार मंगळवेढा)

No comments:
Post a Comment