वैराग परिसरात अवकाळी पावसासह गारपीट; द्राक्ष, आंबा व रब्बी पिकांचे मोठे नुकसान
वैराग (कटूसत्य वृत्त): वैरागसह परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्यामुळे द्राक्ष व आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
आठवडाभर कडाक्याच्या उन्हानंतर अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे वैराग, काळेगाव, घाणेगाव, मानेगाव, पिंपरी साकत, जळगाव रुई, रातंजन, हत्तीज, मळेगाव, गौडगाव, शेळगाव राळेरास, लाडोळे, सर्जापूर आदी गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गारांच्या तडाख्यामुळे शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आधीच द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. यंदाही अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंबा पिकालाही मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
या पावसाचा सर्वाधिक परिणाम ज्वारी, गहू, हरभरा व कांदा पिकांवर झाला आहे. काढणीस आलेली पिके भिजल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कांद्याचे पीक भिजल्याने साठवणूक व विक्रीवरही परिणाम होणार आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने पिके घेतली होती. मात्र, अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना या अवकाळी पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे.
दरम्यान, बाधित भागात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच पीकविमा कंपन्यांनी नुकसानभरपाईची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment