6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले
चौकशीसाठी समिती गठीत
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सरकारी रुग्णालयातील अनास्था अनेकदा पाहायला मिळत असते, त्यानिमित्ताने सरकारी यंत्रणेचा चेहरा उघडा पडतो. कधी रुग्णालयात बेडची कमतरता असल्याने रुग्णांना खालीच झोपवण्यात येते.
तर, कधी डॉक्टरच वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांचा ताटकळत बसावे लागते हेही चित्र अनेकदा पाहायला मिळत आहेत. आता, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षीय चिमुकल्या मुलाचे बोट कापण्यासाठी तो रुग्णालयात आला असता, डॉक्टरांनी उजव्याऐवजी डाव्या हाताचे बोट काढल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी, आता प्रशासनाकडून चौकशी देखील करण्यात येणार आहे.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला असून एका सहा वर्षाच्या मुलाचे उजव्या हाताचे बोट काढायचे असताना महिला डॉक्टरने त्याच्या डाव्या हाताच्या बोटाचे ऑपरेशन करण्याचा महाप्रताप केला आहे. ही बाब समजतात संतप्त पालकांनी तक्रार केल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले असून त्या महिला डॉक्टर विरोधात चौकशी समिती नेमणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, सहा वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्रियेत अशा पद्धतीने झालेल्या हलगर्जीपणा मुळे उपजिल्हा रुग्णालयाची अब्रू गेली आहे. तर, चिमुकल्या मुलाचा हात आयुष्यभरासाठी बाधित झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका सहा वर्षे मुलाच्या शस्त्रक्रियेत उजव्या हाताऐवजी त्याचे डाव्या हाताचे बोट काढून टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा पुढे आला आहे. शाहू सुनील दंदाडे या सहा वर्षीय मुलाला दोन्ही हाताला सहा बोटे आहेत. त्यातील उजव्या हाताचे बोट दुखत असल्याने ते काढून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घेण्यात आला होता. या शस्त्रक्रियेसाठी मुलगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता, दरम्यान चिमुकला मुलगा डॉक्टरांना कोणतं बोट काढायचं हे सांगत असतानाही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन उजव्या ऐवजी डाव्या हाताचे बोट डॉक्टरांकडून काढण्यात आल्याची तक्रार दंदाडे कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर, कुणीही दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उजव्याऐवजी डाव्या हाताचे बोट काढल्याच्या आरोपामुळे उपजिल्हा रुग्णालयातील नवीन प्रताप समोर आला आहे.

No comments:
Post a Comment