महापौर निवडीवरून मराठा समाज आक्रमक; रक्ताने पत्र देत आंदोलनाचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

महापौर निवडीवरून मराठा समाज आक्रमक; रक्ताने पत्र देत आंदोलनाचा इशारा

 महापौर निवडीवरून मराठा समाज आक्रमक; रक्ताने पत्र देत आंदोलनाचा इशारा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून मराठा समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभैय्या जाधव यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र  चव्हाण  यांना उद्देशून देण्यात आले आहे.

रामभैय्या जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे की, १९९३ नंतर तब्बल ३२ वर्षांपासून मराठा समाजाला सोलापूर महापौरपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. विविध कालखंडात पद्मसाली, मुस्लिम, लिंगायत, लमाण, ब्राह्मण, कैकाडी आणि धनगर समाजातील प्रतिनिधींना महापौरपदाची संधी मिळाली; मात्र मराठा समाजाला संधी देण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

“जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. यंदा तीन दशकांनंतर मराठा समाजाला महापौरपद देण्याची संधी भाजपकडे असताना शहरातील काही प्रमुख नेत्यांमुळे ती संधी गमावली गेली, असा आरोपही त्यांनी पत्रातून केला.

जिल्हा परिषद निवडणुकांचा संदर्भ देत ६८ पैकी ३० जागांवर भाजपविरोधी उमेदवार निवडून आल्याचे त्यांनी नमूद केले असून, हीच मराठा समाजाच्या नाराजीची प्रतिक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र  फडणवीस  यांनी २०१६ मध्ये घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा तसेच २०२५ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मराठा समाजाने पहिला सत्कार केल्याची आठवणही जाधव यांनी करून दिली.

“आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या विरोधात नाही; प्रत्येक समाज हा आमचा लहान भाऊ आहे. मात्र शैक्षणिक, राजकीय, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजावर अन्याय झाल्यास कोणत्याही पक्षाविरुद्ध आवाज उठवला जाईल,” असा इशारा देत मराठा समाज अन्याय कधीही विसरणार नसल्याचे जाधव यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.

या पत्रामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages