शक्तिपीठ महामार्गावरून संघर्ष पेटला; राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

शक्तिपीठ महामार्गावरून संघर्ष पेटला; राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन

शक्तिपीठ महामार्गावरून संघर्ष पेटला; राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन



कोल्हापूर (कटूसत्य वृत्त):– प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांत शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र होत असून, “रक्ताचे पाट वाहतील; पण एक इंचही जमीन देणार नाही,” असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते विजय देवणे यांनी दिला. सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

देवणे म्हणाले, ज्या जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकरी या प्रकल्पाला ठाम विरोध करत असताना सरकार दडपशाहीने भूसंपादन करत आहे. परभणी येथे मोजणीदरम्यान शेतकरी व महिलांवर हल्ला करून बळजबरीने जमीन घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. “राज्यातील शेतकरी जशास तसे उत्तर देईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

डॉ. उदय नारकर यांनी सरकारवर टीका करत विचारले, “महामार्गाची गरज नसताना एवढा अट्टाहास का?” उद्योगपतींच्या सोयीसाठी शेतकऱ्यांचा गळा दाबण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “ही आता ‘आर या पार’ची लढाई आहे,” असेही ते म्हणाले.

या आंदोलनात समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी कांबळे, सम्राट मोरे, शशिकांत चुयेकर, जे. एन. पाटील, युवराज शेटे, कृष्णात पाटील, विनायक घोरपडे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, रत्नागिरी येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “शक्तिपीठ महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच काम केले जाईल. त्यांच्या विरोधात जाऊन महायुती सरकार कोणतेही काम करणार नाही.”

सांगलीतही शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी बैलगाडी व ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. “महामार्गाचा आम्हाला फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या जमिनी देणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी सभेत मांडली.
शक्तिपीठ महामार्गावरून राज्यात संघर्षाची ठिणगी पडली असून पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages