“काठावर बसून आमच्या दुःखाची झळ कळणार नाही” रोहित पवारांचा विखे पाटील यांना सडेतोड प्रत्युत्तर
मुंबई (कटूसत्य वृत्त) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाती निधनानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, आता आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर “अपघाताचं राजकारण करत आहेत” असा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भावनिक आणि सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
विखे पाटील म्हणाले होते की, अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी काही जण राजकारण करत आहेत आणि लोकांचा बुद्धिभेद करत आहेत. “ही घटना दुर्दैवी आहे. सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार थांबवावा. कुटुंबावर दुःखाचा आघात झाला असताना आरोप-प्रत्यारोप योग्य नाहीत,” असा सल्लाही त्यांनी रोहित पवारांना दिला होता.
तसेच, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DGCA ला पत्र लिहून चौकशीबाबत पावले उचलली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विखे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “ज्येष्ठ नेत्यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजितदादांसारखा प्रसंग कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये. वेदना काय असते, ती ज्याचं जळतं त्यालाच कळते.”
“मी अजितदादांच्या अपघाताविषयी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारलेला नाही. उलट, अपघाताच्या चौकशीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मग विखे पाटील साहेब हा विषय राजकारणाशी जोडून चौकशीला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.
“काठावर बसून आमच्या दुःखाची धग कळणार नाही. त्यामुळे किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत,” अशी विनंती त्यांनी केली.
२८ जानेवारी रोजी सकाळी बारामती येथे प्रचारासाठी जात असताना अजित पवार यांच्या विमानाचे क्रॅश लँडिंग झाले. या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.
अपघातानंतर रोहित पवार यांनी दोन पत्रकार परिषदांद्वारे विमान अपघातातील तांत्रिक बाबी, चौकशीचा वेग आणि काही संशयास्पद मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, “अजितदादांच्या मृत्यूबाबत घातपाताचा मुद्दा मांडला की भाजप नेत्यांना राग का येतो?” असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही पोस्ट्समध्ये भाजपच्या नेत्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे दावेही करण्यात येत आहेत. मात्र या दाव्यांना अधिकृत दुजोरा नाही.
एकीकडे रोहित पवार चौकशीबाबत पारदर्शकतेची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते त्यांना राजकारण टाळण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे दुःखद घटनेवरून सुरू झालेली चर्चा आता राजकीय संघर्षात परिवर्तित होताना दिसत आहे.
दरम्यान, अपघाताच्या चौकशीचा अधिकृत अहवाल येईपर्यंत आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच राहण्याची शक्यता आहे.

0 Comments