आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य कुंडली होणार डिजिटल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य कुंडली होणार डिजिटल

 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य कुंडली होणार डिजिटल




सोलापूर (कटूसत्य वृत्त): पारधी समाजासह ४७ अनुसूचित जमाती प्रवर्गातील विविध जातींमधील असंख्य विद्यार्थी राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने आता प्रत्येक विद्यार्थ्याचे डिजिटल आरोग्य कार्ड (हेल्थ कार्ड) तयार करण्यात येणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती संकलित करून ती अंकीय (डिजिटल) प्रणालीमध्ये नोंदवली जाणार आहे. विद्यार्थी आणि त्याचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

आदिवासी प्रवर्गात महादेव कोळी, भील, पारधी, गोंड, वारली, कातकरी, कोकणा, कोरकू, कोलाम, आंध, बागा, बर्दा, बावचा, भैना, भरिया व तडवी भील आदी जातींचा समावेश होतो. या जमातींतील अनेक कुटुंबे डोंगराळ व दुर्गम भागात वास्तव्य करत असल्याने त्यांच्या मुलांना आश्रमशाळांमध्ये राहून शिक्षण घ्यावे लागते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत सर्व विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल आरोग्य कार्ड वितरित करण्यात येईल.

सदर आरोग्य कार्ड तयार करताना आश्रमशाळेत नियुक्त आरोग्य सेविकेमार्फत विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. या प्रणालीचे नियंत्रण आश्रमशाळा स्तरापासून विभागीय प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्त तसेच आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तालय स्तरावरून केले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

आदिवासी विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत हा निर्णय उच्च स्तरावर घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहून त्यांचा शैक्षणिक विकास अधिक सक्षम होईल, असा विश्वास धनंजय झाकडे, प्रकल्प संचालक, विभागीय आदिवासी प्रकल्प कार्यालय यांनी व्यक्त केला.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages