समाज माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषेचा सन्मान वाढवावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 28, 2026

समाज माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषेचा सन्मान वाढवावा

 समाज माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषेचा सन्मान वाढवावा

                                    - उपजिल्हाधिकारी अंजली मरोड

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा



 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-(जिमाका):- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बाब ही मोठा सन्मान आहे. आपली मराठी भाषा साधी, सरळ व सहज बोलली जाणारी असून तिच्या लयीत ठराविक अंतराने बदल होत असतो. इतर राज्यातील लोक सहज मराठी भाषा आत्मसात करतात. आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषेचा जागतिक स्तरावर सन्मान वाढवावा, प्रत्येक व्यक्तीने महिन्यातून किमान एक तरी मराठी पुस्तक वाचावे, यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन समाज समृद्ध होतो, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सचिव अंजली मरोड यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कासेकर, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्राध्यापक शिवाजी शिंदे, प्राध्यापिका श्रुती वडकबाळकर, तहसीलदार सरस्वती पाटील, तहसीलदार पूनम दंडीले, मराठी भाषा समिती सदस्य पद्माकर कुलकर्णी आदी मान्यवर व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

             प्राध्यापिका श्रुती वडकबाळकर यांनी मराठी भाषा ही देशातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याचे सांगितले. संत साहित्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली असून ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथामुळे ती सर्व समाजापर्यंत पोहोचली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेत 48 प्रकारचे काव्य रचले गेले असून कवितेमध्ये शब्दांचे सामर्थ्य प्रभावी असते, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी मराठी शाळांची संख्या कमी होत असल्याची खंतही व्यक्त केली. 

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक प्राध्यापक शिवाजी शिंदे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा शिकण्यास सोपी व समृद्ध असल्याचे सांगितले. जुने ग्रंथ संगणकीकरणाद्वारे जतन होत असून भविष्यातील पिढ्यांसाठी ते महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मराठीत अधिकाधिक साहित्य व काव्यनिर्मिती व्हावी, असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी भाषा समिती सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages