सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या हंगामात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रब्बी हंगामातील लाल कांद्याला सरासरी ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, कांद्याचा एकरी उत्पादन खर्च ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत गेला आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि वाहतूक खर्च वाढला आहे. त्यातच अतिवृष्टी व प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटले. उत्पादन कमी आणि दरही कमी असा दुहेरी फटका बसत आहे.
काढणी व बाजारात माल पोहोचवण्याचा खर्चही सध्याच्या दरात निघत नसल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याने काढणी खर्च परवडत नसल्याने उभ्या कांद्यावर नांगर फिरवल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. वर्षभराचा संसार आणि कर्जफेड कशी करायची, याची चिंता उत्पादकांना सतावत आहे.
निर्यात धोरणाचा परिणाम?
बाजार अभ्यासकांच्या मते, केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामुळे देशांतर्गत बाजारात अतिरिक्त साठा निर्माण झाला. निर्यात निर्बंध व किमान निर्यात मूल्यामुळे परदेशी मागणी घटली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर झाला. परिणामी स्थानिक बाजारात भाव घसरत आहेत.
मंगळवारी बाजार समितीत ४१ हजार ६५८ क्विंटल कांद्याची आवक झाली. १०० ते १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, तिरुअनंतपुरम तसेच कोलकाता येथून मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले; मात्र देशांतर्गत मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने दरावर दबाव कायम आहे.
दरम्यान, कांदा उत्पादकांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हमीभाव जाहीर करावा, निर्यात सुलभ करावी व खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment