सोलापूरमधील तरुणाई माव्याच्या विळख्यात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

सोलापूरमधील तरुणाई माव्याच्या विळख्यात

 सोलापूरमधील तरुणाई माव्याच्या विळख्यात




नागरिकांकडून कॅन्सरचं विष पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर मधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात एकीकडे गुटखा विक्रीवर बंदी असताना सोलापुरात चौका-चौकांतील टपऱ्यांमध्ये मावा अगदी सहज विकत मिळतोय.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणाई या माव्याच्या व्यसनाच्या विळख्यत सापडले आहेत. ज्याला या माव्याचं व्यसन जडलं तो तरुण दिवसाला या माव्याची कमीत कमी दोन ते तीन पाकीटं सहज फस्त करतो. आणि जर त्याला मावा मिळाला नाही तर त्याचा जीव कासावीस होतो. त्यामुळे तरुणांमध्ये हे कॅन्सरचं विष पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीये.


माव्यामुळे जिल्ह्यातील एक तरुण कॅन्सरच्या विळख्यात

या माव्यामुळे सोलापुरातील एका तरुणाला कॅन्सर झाला. उपचार घेतल्यानं तो मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलाय. आता तो इतर तरुणांना या माव्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतोय. किक बसण्यासाठी माव्यात घातक पदार्थाचा वापर केला जातो. हा मावा निकृष्ट दर्जाच्या सुपारीपासून बनवला जातो. मावा तयार करताना त्यात चुना, कात, पाणी तसंच विशिष्ट प्रकारचं द्रव्य वापरलं जातं. अनेक जण तर या माव्याचं व्यसन लागावं यासाठी त्यात गांजाचं पाणीही वापरतात. या माव्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेटसारखे घातक घटक असतात जे कॅन्सरला आमंत्रण देतात. त्यामुळे असल्या घातक व्यसनांपासून चार हात लांब राहा असा सल्ला डॉक्टरांनीही दिलाय.

नागरिकांकडून मावा विक्रीवर कारवाई करण्याची मागणी

मावा विक्रेत्यांची आता फ्रँचायझी देण्यास सुरूवात केलीये. त्यामुळे सोलापुरची ओळख आता माव्याचा जिल्हा म्हणून बनली आहे. मावा विक्रीतून रोज लाखोंची उलाढाल होतीये. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत आहे. तर काही ठिकाणी चिरीमिरी कारवाई होते. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच होते. त्यामुळे गुटखा, मावा विक्रीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागलीये.

माव्याचे सेवन ठरते तोंडाच्या कॅन्सरसाठी खुले निमंत्रण

मावाच्या सेवनामुळे प्रामुख्याने तोंड, जीभ, घसा आणि अन्ननलिकेचा कॅन्सर होतो. यात असलेल्या तंबाखूमुळे पेशींचे नुकसान होते, जे तोंडाचा कॅन्सर आणि इतर गंभीर कॅन्सरसाठी खुले निमंत्रण ठरते. तंबाखूमध्ये कार्सीनोजेन्स नावाची हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे कर्करोग होतो. तंबाखूच्या धूरात 70 पेक्षा अधिक प्रकारची कर्करोग निर्माण करणारी रसायने असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोसामाइन्स, टार, बेंझिन, आर्सेनिक, निकेल आणि पोलोनियम-210 यांसारखे किरणोत्सर्गी घटकांचा समावेश असतो. यामुळे कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी मवा किंवा कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन करणे टाळले पाहिजे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages