सोलापूरकरांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने ठोस नियोजन करावे – महापौर विनायक कोंड्याल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

सोलापूरकरांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने ठोस नियोजन करावे – महापौर विनायक कोंड्याल

 सोलापूरकरांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने ठोस नियोजन करावे – महापौर विनायक कोंड्याल


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली. शहराला योग्य, सुरळीत आणि वेळेत पाणीपुरवठा कसा करता येईल याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस सभागृहनेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे,उपायुक्त आशिष लोकरे सह. आयुक्त शशिकांत भोसले, सह. गिरीष पंडित, सह. आयुक्त मनीषा मगर सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे सतीश एकबोटे, सिद्धेश्वर उत्सुरगे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.शहरातील विविध भागांना सध्या किती दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, वितरण व्यवस्थेतील अडचणी, पंपिंग व्यवस्था, गळती, पाणीसाठा आणि आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन यांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः उन्हाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता आणि पुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी प्रशासनाला सूचना देताना सांगितले की, सोलापूरकरांना नियमित आणि वेळेत पाणी मिळणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. शहरास दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन सादर करावे. यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, मनुष्यबळ आणि पाणी व्यवस्थापन यांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा.बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक तांत्रिक तपशील आणि नियोजनासाठी काही कालावधीची मागणी केली. त्यानुसार लवकरच सविस्तर कृती आराखडा सादर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.महापौरांनी पुढे सांगितले की, पाणीपुरवठा संदर्भात पूर्वी काम पाहिलेल्या वरिष्ठ व माजी अधिकाऱ्यांशीही चर्चा करून त्यांचे अनुभव व मार्गदर्शन घेण्यात येईल, जेणेकरून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि शाश्वत करता येईल.सोलापूर महानगरपालिका नागरिकांना योग्य, नियोजित व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच पुढील बैठक घेऊन ठोस निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages