Hot Posts

6/recent/ticker-posts

आजपासून EVM यंत्रांची तपासणी होणार

 आजपासून EVM यंत्रांची तपासणी होणार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह राहावी, यासाठी मतदान यंत्रांची (EVM) FLC – First Level Checking (प्रथमस्तरीय तपासणी) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया सोलापूर महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या सर्व मतदान यंत्रांवर करण्यात येणार आहे.

ही FLC प्रक्रिया दि. 02 जानेवारी 2026 ते 04 जानेवारी 2026 या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागील सभागृहात, दररोज सकाळी 11.00 वाजता पार पडणार आहे. या तपासणीदरम्यान मतदान यंत्रांची तांत्रिक स्थिती, कार्यक्षमता तसेच सुरक्षिततेची सखोल व काटेकोर पाहणी केली जाणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचा एक अधिकृत प्रतिनिधी FLC प्रक्रियेसाठी उपस्थित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित प्रतिनिधीने आपल्या पक्षाचे अधिकृत प्राधिकरण पत्र (Authorization Letter) तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयाने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत FLC प्रक्रिया पार पडल्यास मतदान यंत्रांबाबत असलेला संभ्रम दूर होऊन निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा व राजकीय पक्षांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

FLC प्रक्रियेचा तपशील :
▪️ दिनांक : 02 जानेवारी 2026 ते 04 जानेवारी 2026
▪️ स्थळ : हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागील सभागृह, सोलापूर
▪️ वेळ : सकाळी 11.00 वाजता

सोलापूर महापालिका निवडणूक शांततेत, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर तयारी सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून ही FLC प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments