फोटो खाली 'सौजन्य- सकाळ' असे टाका
भाजपमधील असंतोषाचा उद्रेक;
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वेदनांवर सुषमा अंधारेंचे सडेतोड पत्र
मुंबई (कटूसत्य वृत्त):- तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी भाजपमध्ये उत्साहाऐवजी तीव्र अस्वस्थता आणि रोष निर्माण केला असून, उमेदवारी वाटपावरून पक्षात उघडपणे गोंधळ, संताप आणि बंडखोरीचे चित्र दिसू लागले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना तिकीटे देण्यात आल्याने भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा संयम सुटल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या “काळजाला हात घालणारे” सडेतोड पत्र लिहून थेट भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यातील विविध शहरांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला.
कुठे कार्यकर्त्यांनी नेत्यांना शिवीगाळ केली, कुठे मारहाणीचे प्रकार घडले, तर काही ठिकाणी आमदारांच्या गाड्यांचा पाठलाग, पक्ष कार्यालयासमोर उपोषणे, आत्मदहनाचे प्रयत्नही झाले. संभाजीनगरमध्ये एका महिला कार्यकर्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली, तर नाशिकमध्ये एबी फॉर्म घेऊन पळणाऱ्या आमदाराच्या मागे कार्यकर्ते धावताना दिसले. पुणे, मुंबई, ठाणे यांसारख्या महानगरांतही इच्छुक उमेदवारांचा संताप उफाळून आला.
या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी लिहिलेल्या पत्रात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची व्यथा मांडली आहे. “तुमची अस्वस्थता, आक्रोश आणि हतबलता माध्यमांतून सर्वांपर्यंत पोहोचते आहे, पण ती तुमच्या नेत्यांपर्यंत पोहोचत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली आहे.
अंधारे यांनी आरोप केला की, सत्तेच्या लालसेपोटी भाजपने ईडी, सीबीआय आणि अन्य यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांतील भ्रष्ट, गुन्हेगार आणि स्वार्थी नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. या नव्याने आलेल्या लोकांना जागा देण्यासाठी वर्षानुवर्षे पक्ष वाढवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारण्यात आले.
“ज्यांनी घर बांधलं, त्यांनाच घरातून हाकलून देण्याचा क्रूर मार्ग भाजपने अवलंबला,” असा थेट आरोप त्यांनी केला.
पत्रात अंधारे यांनी रूपकात्मक भाषेत भाजपची स्थिती मांडताना म्हटले आहे की, “वारूळ मुंग्या बांधतात, पण त्यात राहायला विषारी नाग येतात.” भाजपचे सत्तेचे वारूळ निष्ठावंतांनी उभारले, मात्र आज त्या वारुळात बाहेरून आलेले सत्तांध लोक राहात असल्याची टीका त्यांनी केली. म्हणजेच “वारूळ मुंग्यांचं, पण राहतात नाग” असंच त्यांना म्हणायचे असेल.
“मोदी का परिवार” अशी भावना जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून अंधारे म्हणतात की, तुम्ही परिवाराचा सदस्य नसून सत्तेपर्यंत जाण्यासाठीची एक पायरी आहात. नव्यांना घरात बसवण्यासाठी जुन्यांना रस्त्यावर आणले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. “तुम्ही परिवाराचा भाग नाही, फक्त पायरी आहात”.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असूनही भाजप आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी का ठेवू शकत नाही, असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी म्हटले की, सत्ता मिळवण्याइतकेच ती पचवणेही अवघड असते आणि भाजपला हे यश पचवता येत नाही.
सुषमा अंधारेंच्या या पत्रामुळे भाजपमधील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा असंतोष भाजपसाठी किती अडचणीचा ठरेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

0 Comments