विश्वास पाटील यांनी माफी मागावी, अन्यथा साहित्य संमेलन उधळून लावू
सातारा (कटूसत्य वृत्त) :- ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीतील कथित आक्षेपार्ह व अनैतिहासिक मजकुराच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून, “तात्काळ जाहीर माफी मागून आक्षेपार्ह मजकूर दुरुस्त करावा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावले जाईल,” असा थेट इशारा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून, तातडीने मध्यस्थी बैठक आयोजित करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडने विश्वास पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत, “विश्वास पाटील हे जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. “छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि पराक्रमावर संशय निर्माण करणारे लिखाण करून महाराष्ट्राच्या इतिहासाची बदनामी करण्यात आली आहे,” असा आरोप ब्रिगेडने केला आहे.
या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साताऱ्यातील पवई नाका परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विश्वास पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन लेखी निवेदन सादर केले. तसेच या प्रकरणी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती ब्रिगेडने दिली.
संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि संमेलन शांततेत पार पडावे, या दृष्टीने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड बैठक घेण्यात आली. या बैठकीत कादंबरीतील वादग्रस्त मजकूर, जाहीर माफीची मागणी, तसेच संमेलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
“माफी नाही तर इशारा मागे घेणार नाही” या इशार्यावर बैठकीनंतरही संभाजी ब्रिगेड आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आहे. “विश्वास पाटील यांनी जाहीर माफी मागितली नाही, तर दिलेला इशारा मागे घेतला जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत ब्रिगेडने जाहीर केले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणाकडे लागले असून, त्या व्यासपीठावर विश्वास पाटील माफी मागतात का, यावर संमेलनाचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र आहे.
या वादामुळे मराठी साहित्य संमेलनावर राजकीय व सामाजिक तणावाचे सावट निर्माण झाले असून, पुढील घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित झाले आहे.

0 Comments