Hot Posts

6/recent/ticker-posts

पांडव सेने’च्या एकजुटीने भाजपचा पराभव अटळ :- आडम मास्तर

 पांडव सेने’च्या एकजुटीने भाजपचा पराभव अटळ :- आडम मास्तर




सोलापूर (कटुसत्य वृत्त):- देशात सध्या जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू असून त्यामुळे लोकशाहीची घडी विस्कटली आहे. देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा वेळी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप वगळता सर्व पक्ष एकत्र येणे ही स्वागतार्ह बाब आहे. जनतेने भाजपच्या विभाजनकारी राजकारणाला झिडकारून विकासाभिमुख महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

सोमवारी गांधीनगर येथील हेरिटेज लॉनवर महापालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते. कार्यक्रमास खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, मनसेचे प्रशांत इंगळे आदी उपस्थित होते.

उजनी–सोलापूर जलवाहिनी योजनेचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, सुरुवातीला या योजनेवर टीका झाली होती, मात्र आज ती सोलापूरकरांसाठी वरदान ठरत आहे. निवडणुकीनंतर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता आली, तर सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विजय जवळ असून सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही ते म्हणाले.

माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना सांगितले की, महापालिका निवडणुकीत उमेदवारांना कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवली जात असून पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. भाजपविरोधात आवाज उठवत राहणार असून, आमचा महापौर बसू द्या, वर्षभरात दररोज पाणी देऊन दाखवू तसेच सहा महिन्यांत १०० बस आणून शहराची परिवहन व्यवस्था सुधारू, असे आश्वासन त्यांनी दिले.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, भाजपने सत्ता टिकवण्यासाठी सर्व प्रयोग केले, मात्र सोलापुरात महाविकास आघाडीचा विजय अटळ आहे. भाजपच्या चुका आता जनतेला स्पष्टपणे दिसत आहेत.

यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका केली. प्रास्ताविक प्रा. अशोक निंबर्गी यांनी केले, तर सूत्रसंचालन भारत मुठे यांनी केले. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा परिचय केशव इंगळे यांनी करून दिला.

ही केवळ आघाडी नव्हे, ‘पांडव सेना’
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेले पक्ष म्हणजे केवळ महाविकास आघाडी नसून अन्यायाविरुद्ध लढणारी ‘पांडव सेना’ आहे. भाजपरूपी कौरवांना हद्दपार केल्याशिवाय ही पांडव सेना गप्प बसणार नाही, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments