प्रचाराच्या रिक्षांसाठी परवानगीला विलंब, पालिकेत रांगा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. सोमवारी या कक्षात प्रचारासाठी रिक्षा व इतर परवानग्यांसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परवानगी प्रक्रियेस विलंब होत असल्याने कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी उमेदवार व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने एक खिडकी कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षामार्फत प्रचार वाहन परवानगी, खासगी जागेवरील बॅनर व फलक लावण्याची परवानगी, तात्पुरते प्रचार कार्यालय उभारण्याची परवानगी आदी सुविधा एका ठिकाणी देण्यात येत आहेत. या प्रक्रियेत महापालिका, पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे कार्यरत आहेत.
दरम्यान, सोमवारी विविध परवानग्यांसाठी अर्जदारांची मोठी गर्दी झाली. खिडक्यांची संख्या अपुरी असल्याने रांगा वाढल्या. अर्ज स्वीकारले जात असले तरी पोचपावती दिली जात नसल्याची तक्रार आहे. प्रचार रिक्षा परवानगीसाठी अनेक कागदपत्रांची मागणी केली जात असून, परवाने मिळण्यास विलंब होत असल्याने रिक्षा चालकांना दीर्घकाळ थांबावे लागत आहे.
या ठिकाणी टोकन सिस्टीम सुरू करावी, बसण्याची व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी उमेदवार व कार्यकर्त्यांकडून होत आहे. प्रचारासाठी उपलब्ध दिवस कमी असल्याने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक सूचना द्याव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
.png)
0 Comments