सिद्धी वस्त्रे यांनी स्वीकारला मोहोळच्या नगराध्यक्षपदाचा पदभार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी गवत्या मारुती चौक येथून नगरपरिषदेपर्यंत भव्य पदयात्रा काढत वाजत-गाजत नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नगराध्यक्षांसह उपस्थित मान्यवरांनी हातात झाडू घेऊन ‘स्वच्छ मोहोळ, सुंदर मोहोळ’चा नारा देत शहरातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवली.
सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत केवळ २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शितल क्षीरसागर यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला होता.
सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे म्हणाल्या, “जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या संधीचे सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहील. विरोधक हे निवडणुकीपुरते होते, आता शहराच्या विकासावर पूर्ण लक्ष दिले जाईल.”
याप्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी नूतन नगराध्यक्षांचा सत्कार केला. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, पद्माकर देशमुख, माजी नगराध्यक्ष रमेश बरसकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणाज चवरे, अतुल क्षीरसागर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments