आरोग्य सुविधा व प्राणी संग्रहालयावर भर; प्रभाग २२ मधील भाजप पदयात्रा
प्रभाग क्र. २२ मधील इण्णा वस्ती, लिमयेवाडीमध्ये किसन जाधव यांचे आश्वासन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
रामवाडी व सेंटलमेंट भागातील अनेक गोरगरिबांना सरकारी मोफत आरोग्य सुविधांची माहिती नसते. यामुळे भाजपचे प्रभाग २२ मधील उमेदवार किसन जाधव यांनी शनिवारी सांगितले की, या गोरगरिबांच्या मदतीसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा कक्ष तयार करण्याचा विचार आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ लिमयेवाडी येथे आयोजित बैठकीत जाधव बोलत होते. यावेळी प्रभागातील भाजपचे उमेदवार दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड आदी उपस्थित होते. पत्रकारांनी सेंटलमेंट भागातील लोक सरकारी आरोग्य सुविधांपासून वंचित असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
जाधव म्हणाले की, दोन नंबर झोपडपट्टी इरण्णा वस्ती, मोठे इराणा वस्ती, धोंडीबा वस्ती, सनत नगर, मंजुनाथ नगर, लिमयेवाडी सेटलमेंट, यतीम खाना, विजापूर नाका परिसर या भागात कष्टकरी कामगारांची मोठी लोकसंख्या आहे. रोजगाराच्या व्यस्ततेमुळे गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे इच्छा भगवंताची परिवाराकडून प्रभागात एक स्वतंत्र मदत कक्ष तयार करण्याचा मानसआहे. तसेच प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, समाज मंदिरे व मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपये निधी आणला आहे.
प्राणीसंग्रहालय पुन्हा सुरू करणार
प्रभागातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाने काढलेल्या त्रुटींमुळे बंद आहे. जाधव म्हणाले की, प्राणी संग्रहालय सुरू झाल्यास लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र बनेल. आ. देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून हे प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू करायला लावणार आहेत.
पदयात्रे दरम्यान भाजपचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका गायकवाड, चैत्राली गायकवाड उपस्थित होते आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
0 Comments