Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरकरांना दररोज पाणी देण्याचा माझा शब्द,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांना अभिवचन :

 सोलापूरकरांना दररोज पाणी देण्याचा माझा शब्द,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांना अभिवचन : 

हजारोंच्या गर्दीत झाली उत्साही विजय संकल्प सभा

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहराची लोकसंख्या २०५७ जितकी असेल त्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी दररोज देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा महापौर झाल्यानंतर काही काळातच सोलापूरकरांना दररोज पिण्याचे पाणी देण्याचा शब्द मी देत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सोलापूरकरांना अभिवचन दिले. हजारो सोलापूरकरांच्या गर्दीत शनिवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य विजय संकल्प सभा झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान अवताडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपच्या  शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) चेतनसिंह केदार, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र  जन्नू, सरचिटणीस सुधा अळीमोरे, डॉ. शिवराज सरतापे, पांडुरंग दिड्डी, प्रा. मोहिनी पत्की, उपाध्यक्ष मोहन डांगरे श्रीनिवास दायमा, रुद्रेश बोरामणी, अंबादास बिंगी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, डॉ. आदर्श मेहता, कुमुद अंकाराम, ऍड. साधना संगवे, लक्ष्मण गायकवाड, श्रीनिवास दासरी, देविदास बनसोडे, देविदास जंगम, देवेंद्र भंडारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोलापूर शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी ८९२ कोटी रुपये निधीची योजना लवकरात लवकर पूर्ण करणे, सोलापूर शहरातील चाळींच्या पुनर्विकासाला चालना देणे, संपूर्ण शहरासाठी पिण्याचे पाणी, मलनिस्सारण प्रकल्प करणे,आवास योजनापूर्ती, अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील सुविधांची पूर्तता यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

सोलापूरकरांचा भाजपावर प्रचंड विश्वास आहे. मध्यमवर्गीयांच्या, सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी सोलापूरचे चित्र बदलण्याकरता भाजप काम करत राहणार आहे. जिथे विमानसेवा सुरू होते तिथे उद्योग व्यापार आणि पर्यायाने रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. सोलापूर या औद्योगिक नगरीला भरभराट आणण्यासाठी विमानसेवा भाजपा सरकारने सुरू केली आहे. आगामी काळात सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगचीही सुविधा देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोलापूरची विमानसेवा सुरू होणार नाही असे काही जण म्हणत असत. परंतु भाजपाने विमानसेवा सुरू करून दाखवली असेही त्यांनी सांगितले.

सोलापूरची ओळख चादर, कडक भाकरी, हुरडा, शेंगा चटणी जशी आहे त्याचसोबत सोलापूरला आधुनिक शहराची ओळख मिळवून देण्याचे आमचे स्वप्न आहे. सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) शहरांचा ६५ टक्के वाटा आहे. परंतु गेल्या ७० वर्षांमध्ये शहराच्या सुधारणांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शहर सुधारण्याकडे देशाचे लक्ष वेधत शहरांच्या सुधारणेला प्राधान्य दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोलापूरवर विशेष प्रेम आहे. त्यांनी सोलापूरसाठी नाशिक - सोलापूर - अक्कलकोट असा महामार्ग मंजूर केला आहे. हा रस्ता थेट देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या वाढवण बंदराला जोडत असल्यामुळे या परिसरात औद्योगीकरणाकरता नवी इकोसिस्टीम तयार होणार आहे. तसेच हा रस्ता मुंबई - दिल्ली महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाची गती वाढणार आहे.

सोलापूर हे यंत्रमाग, विडी कामगार, विणकर आणि कामगारांचे शहर आहे. सोलापूरकरांच्या योगदानातून येथील अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. सोलापुरातील यंत्रमाग उद्योगाला उभारी देण्यासाठी इचलकरंजी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. सोलापूरच्या परिसरात श्री सिद्धरामेश्वरांसह अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आदी तीर्थक्षेत्रे असल्यामुळे भविष्यात सोलापूर हे पर्यटनाचे इंजिन म्हणून काम करणार आहे. कमळ हे लक्ष्मीचे वाहन असून समृद्धीचे प्रतीक आहे. सोलापूरकरांनी १५ जानेवारीला कमळाची काळजी घ्यावी. १६ जानेवारीपासून तुमची काळजी देवाभाऊ घेईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना आश्वस्त केले.

महापौर भाजपचाच होणार

सोलापूरने आजवर ज्या ज्या योजना, प्रकल्प, निधी मागितले ते सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. सोलापूरचा चौफेर विकास होत आहे. सोलापूरचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे सोलापुरातील सर्व लाडक्या बहिणींसह सर्व सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी केले.

रोज पाणी दिल्याशिवाय मत मागायला येणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ८९२ कोटी रुपयांची महत्त्वकांक्षी योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संपूर्ण पाठबळ सोलापूरला आहे. त्यामुळे ही योजना लवकरच पूर्णत्वास येणार आहे. सोलापूरला दररोज पाणी दिल्याशिवाय पुन्हा मते मागायला येणार नाही, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी ठामपणे सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments