आधुनिक आयटी पार्क उभारून तरुणांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : सोलापूरकरांच्या आशा पल्लवीत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापुरात आधुनिक आयटी पार्क उभारून सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याला आमचे प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या भाजपाच्या विजय संकल्प सभेत सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांचे स्वप्न असलेले आयटी पार्क काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाले असून ते आता दृष्टीक्षेपात आहे. सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना सोलापूर शहरातच नोकरीच्या मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी सोलापूरकर आग्रही आहेत. मात्र सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना सोलापूरच्या बाहेर जाऊन नोकरी शोधावी लागत आहे. सोलापूर शहरातील हजारो तरुण वेगवेगळ्या नोकरी, रोजगारासाठी शहराबाहेर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे आयटी पार्कबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागीलवेळी झालेल्या सोलापूरच्या दौऱ्यात सोलापुरातील आयटी पार्कच्या उभारणीबाबत चर्चा करून आढावा घेतला होता. शनिवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरचे चित्र बदलण्यासाठी भाजपा सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. सोलापुरात आधुनिक पद्धतीचे आयटी पार्क उभे करून सोलापुरातील तरुण पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद अशा शहरांमध्ये न जाता सोलापुरातच राहून त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे सोलापूरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आयटी पार्कची मागणी आता पूर्ण होईल, अशी चर्चा सभास्थळी जमलेल्या सोलापूरकरांमध्ये सुरू होती.


0 Comments