लाडक्या बहिणींना आता करणार 'लखपती दीदी'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : लाडकी बहीण योजना बंद
होणार नसल्याचे केले स्पष्ट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लखपती दीदी ही योजना दिली आहे. सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर सोलापूर शहरातील लाडक्या बहिणींना लखपती दीदी देखील बनविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या विजय संकल्प सभेत सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींनी काळजी करू नये.
महाराष्ट्रातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना काही दिवसांनी बंद होईल असे विरोधकांकडून खोटे सांगण्यात येत होते. परंतु या आरोपात कोणतेही तथ्य नाही. याउलट महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लखपती दीदी या योजनेच्या महाराष्ट्रात ५० लाख लाभार्थी महिला आहेत. पुढील चार महिन्यात लखपती दीदी या योजनेचा एक कोटी महिलांना लाभ मिळेल. लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत. आम्ही आश्वासने देणारे नाहीत तर आश्वासने पूर्ण करणारे आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.


0 Comments