सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून मारवाडी समाजाला पुन्हा एकदा उमेदवारी न दिल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भात सकल मारवाडी (राजस्थानी) समाजाची बैठक घेऊन पुढील राजकीय भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती शहर भाजपचे उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दायमा म्हणाले की, राजस्थानी समाज हा राष्ट्रवादी विचारसरणीचा आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून सुरुवातीपासूनच भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. राज्यात तसेच केंद्रात भाजपची सत्ता असतानाही यंदाच्या महापालिका निवडणुकीत मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व नाकारण्यात आल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने मारवाडी समाजास महापालिकेत प्रतिनिधित्व द्यावे, अशी आग्रही मागणी सकल मारवाडी समाजातर्फे करण्यात आली होती. याबाबत आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र गेल्या वीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत केवळ आश्वासने दिली गेली असून, प्रत्यक्षात समाजाला संधी मिळालेली नाही, असा आरोप करण्यात आला.
मागील निवडणुकीत ‘पुढील वेळी समाजाला न्याय दिला जाईल,’ असे आश्वासन देण्यात आले होते. तरीही यंदा पुन्हा समाजाला डावलण्यात आल्याने सकल राजस्थानी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे दायमा यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या वाढीसाठी सोलापूर शहरात स्व. गोवर्धनदास भुतडा, स्व. गोपीकिसन भुतडा, स्व. मथुरादास डागा, स्व. श्यामसुंदर तिवाडी, विजय बजाज, बाळमुकुंद झंवर यांच्यासारख्या अनेक निष्ठावंतांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र या योगदानाकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याची भावना समाजातील कार्यकर्त्यांमध्ये आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी सकल मारवाडी समाज व भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली होती. पक्षाने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून समाजातील अनेक इच्छुकांनी प्रभाग क्रमांक १, ३, ४ आणि ५ मधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना झुलवत ठेवून अखेरीस तिकीट नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा तीव्र भ्रमनिरास झाला, असा आरोप दायमा यांनी केला.
या प्रकारामुळे समाजात अस्वस्थता असून, लवकरच सकल मारवाडी समाजाची बैठक घेऊन पुढील राजकीय दिशा आणि भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला लक्ष्मीकांत दरग, सविता जोशी, रजनी शर्मा यांच्यासह समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments