महाराष्ट्राची मुलींची घोडदौड, गुजरातवर मात
बेंगलुरू (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राच्या मुलींनी 44व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार गट खो-खो स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
कर्नाटका खो-खो असोसिएशनच्या वतीने बेंगलुरू शहरातील गुंजर मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी गुजरातवर 38-12 अशी एक डाव राखून 26 गुणांनी मात केली. अष्टपैलू कामगिरी करणारे मैथिली पवार (3.40 मिनिटे व 2 गुण) व विद्या तामखेडे (5 मि. व 2 गुण) आणि शानदार सरंक्षण करणारी श्रावणी तामखेडे (2.40 व 1.40 मि.) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गुजरातच्या यू. बराई (2.30 मि.) व कोचाडिया (1.00 व 2 गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
कोल्हापूरचा जम्मू कश्मीरवर धुव्वा
राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूर व विदर्भचेही संघ स्वतंत्र सहभागी होत असतात. कोल्हापूरच्या मुलींनी जम्मू काश्मीरचा एक डाव राखून 47 गुणांनी धुव्वा उडविला. यात भक्तीने 2.20 मिनिटे पळती करीत आक्रमणात 6 गुण मिळविले. चैत्रालीने संरक्षणात 1 व 5 मिनिटे व तर श्रावणी पाटीलने 4 मिनिटे पळतीचा खेळ केला.
विदर्भच्या दोन्ही संघाची आगेकूच
विदर्भच्या कुमार व मुली दोन्ही संघानी विजय मिळवित आगेकूच केली आहे. सूजल खांडेकर (1,1,40 मि. व 2 गुण), मोहित नेवरे ( 3.30 मि. व 2 गुण) व स्मीत कापसे (2.30 मि.) यांच्या बहारदार खेळीमुळे विदर्भच्या कुमारांनी मध्यप्रदेशला 13 गुण व 1 डाव राखून सहज नमविले. मध्यप्रदेशच्या हर्षित विश्वकर्मा (1 मि.) व सागर कुटस्ते (4 गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. विदर्भच्या मुलींनी चंदीगडवर 26 गुण व एका डावाने दणदणीत विजय मिळविला. यात श्रध्दा (4.20 मि. व 6 गुण), कोमल (4.40 मि. व 2 गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. धनश्रीने 4 गुण मिळवित आक्रमणात साथ दिली. चंदीगडच्या महिमाने (1मि. व 2 गुण) हिने एकाकी लढत दिली.

0 Comments