Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगरपरिषदेचा भोंगळा कारभार उघड; कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात पडून

 मोहोळ नगरपरिषदेचा भोंगळा कारभार उघड; कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात पडून


महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अंजली वस्त्रेंचा आरोप


मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगरपरिषदेच्या ढिसाळ, निष्काळजी आणि नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. शहरातील बहुतांश भागात गटारी तुंबलेल्या असून, साफसफाई केवळ कागदावर आणि रंगरंगोटीपुरतीच मर्यादित असल्याचे वास्तव समोर आले आहे. गटारी नीट वाहत नसल्याने नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव व विविध आजारांचा सामना करावा लागत असताना नगरपरिषद प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अंजली वस्त्रे यांनी समस्याग्रस्त नागरिकांसह थेट पाहणी करून धक्कादायक बाबी उघड केल्या. मोहोळ शहराच्या पाण्याच्या टाकीखाली, गरड कॉलेजच्या मागील बाजूस पाहणी केली असता, गटारी साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मशिन्स, ट्रॅक्टरची ट्रॉली, पाण्याचा टँकर, जेसीबी, कचरा उचलण्याची मशीन आदी कोट्यवधी रुपयांची वाहने व यंत्रसामग्री वापराविना पडून असल्याचे निदर्शनास आले. ही वाहने अनेक दिवसांपासून धूळ खात, गंजत पडलेली असल्याचे स्पष्ट दिसत होते.

विशेष म्हणजे, ही यंत्रसामग्री शहरातील प्रत्यक्ष कामांमध्ये कधीच वापरली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मग ही वाहने नेमकी कुठे वापरली जातात? की मुळी वापरातच नाहीत? असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. जर नगरपरिषदेकडे इतकी आधुनिक साधनसामग्री उपलब्ध असेल, तर शहरातील गटारी साफ का होत नाहीत? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ का केला जात आहे? असा थेट सवाल अंजली वस्त्रे यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी नगरपरिषद प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, “ही वाहने कोणी खरेदी केली, कोणाच्या मंजुरीने केली आणि नेमक्या कशासाठी केली, याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेली यंत्रसामग्री वापरात न आणता पडून राहणे म्हणजे जनतेच्या पैशांचा उघड अपव्यय आहे.”

या सर्व बाबींचा जाब विचारण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने समस्याग्रस्त नागरिकांसह नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. शहरातील गटारी तात्काळ साफ करण्यात याव्यात, पडून असलेली यंत्रसामग्री त्वरित प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात यावी, तसेच या खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, समर्थ नगर, मोहोळ येथे सुरू असलेल्या रस्त्यावरील चेंबरच्या कामाची पाहणी करताना अंजली वस्त्रे यांना तेथील गटारी तुंबलेल्या असल्याचेही आढळून आले. यावेळी त्यांनी नगरपरिषदेला गटारी तात्काळ साफ करण्याच्या सूचना केल्या. रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत बोलताना त्यांनी नागरिकांना “मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी थोडासा त्रास सहन करावा लागेल, थोडे अड्जस्ट करावे लागेल,” असे आवाहन केले.

तसेच मोहोळ मेन रोडवरील भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, व्यापाऱ्यांच्या समोर असलेले अतिक्रमण हटवणे या संदर्भात आज दुपारी चार वाजता नगरपरिषद कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व व्यापारी, भाजी विक्रेते व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अंजली वस्त्रे यांनी केले आहे. व्यापारी व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाकडून या गंभीर आरोपांवर अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारींची अवस्था अशीच राहिल्यास शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की पुन्हा एकदा नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होणार, याकडे संपूर्ण मोहोळ शहराचे लक्ष लागले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments