टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून फोक्सो गुन्ह्यातील आरोपी लांडे फरार
पोलीस कस्टडीत असताना बाथरूमजवळून पळ काढण्यात यश; नाकाबंदी व व्यापक शोधमोहीम सुरू
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त) :- टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फोक्सो कायद्यांतर्गत दाखल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस कस्टडीतून फरार झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी घडली. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेसह संपूर्ण टेंभुर्णी परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी अद्याप फरार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 01/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 64(2), 137(2) सह 4, 6, 8 व 12 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे हे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी श्रीकृष्ण अंकुश लांडे (वय 28 वर्षे, रा. परिते, ता. माढा, जि. सोलापूर) यास दि. 23 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1.58 वाजता अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यास दि. 27 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली होती.
तपासादरम्यान आरोपीच्या सुरक्षेसाठी पोहेकॉ 49 परांडे व पो.कॉ. 1218 देशमुख यांची गार्ड म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मंगळवारी तपास कामकाज सुरू असताना आरोपीस लघवीसाठी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूमकडे पोहेकॉ परांडे हे घेऊन गेले. आरोपी लघवी करून बाहेर येताच त्याने अचानक पोहेकॉ परांडे यांच्या हाताला जोराचा हिसका देत तेथून पळ काढला.
ही बाब लक्षात येताच पोहेकॉ परांडे यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे, पो.कॉ. 1218 देशमुख तसेच खाजगी इसम शुभम शिंदे यांनी तात्काळ आरोपीचा पाठलाग केला. मात्र सुमारे दुपारी 4.38 वाजण्याच्या सुमारास आरोपी पळून गेल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
घटनेनंतर तातडीने संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. सपोफौ माळी, सपोफौ रणदिवे, पोहेकॉ 1186 जगताप, पोहेकॉ 1719 सरडे, पोहेकॉ 1625 लांडगे, पोहेकॉ 1675 आरकिले, पोहेकॉ 1622 शिंदे, पोना 339 झोळ, पो.कॉ. 2026 मुलाणी, सपोफौ झिंजे, पो.कॉ. 2145 इंगोले यांना आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्ष व शेजारील पोलीस ठाण्यांना नाकाबंदी करण्याबाबत तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, फरार झालेल्या आरोपीविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास PSI मदने करीत आहेत. मात्र सायंकाळ उशिरापर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपी श्रीकृष्ण अंकुश लांडे याचे वय 28 वर्षे असून त्याची उंची सुमारे 5 फूट 6 इंच आहे. त्याचा रंग सावळा असून ओळखीची खूण बारीक दाढी आहे. पळताना त्याने हिरवा टी-शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली होती.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी ऊसाच्या शेतात किंवा आजूबाजूच्या पिकांमध्ये लपून बसलेला असण्याची शक्यता असून, कोणत्याही शेतकऱ्यास किंवा नागरिकास सदर संशयित आढळून आल्यास तात्काळ टेंभुर्णी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.
या घटनेमुळे टेंभुर्णी व परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

0 Comments