महिलांना लखपती करण्यासाठी कर्ज पुरवठा करा- सीईओ जंगम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील महिला बचत समूहातील महिलांना लखपती करण्यासाठी बँकांनी त्यांच्या वैयक्तिक व्यवसायाला कर्ज पुरवठा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय बँकर्स प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सीईओ जंगम बोलत होते. यावेळी जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मन्सूर पटेल, शुभांगी देशपांडे, खंडेराव दीक्षित, दयानंद सरवळे, संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी मडवळी, शीतल म्हंता उपस्थित होते.
सीईओ जंगम म्हणाले, ग्रामीण भागातील महिला या उमेद अभियानातून व बँकेच्या माध्यमातून दिले जाणारे अर्थसहाय्य हे त्यांच्या उद्योग उभारणीसाठीच वापर करत आहेत. बचत गटाच्या महिलांनी कर्जाची रक्कम वेळेवर परतफेड करत असल्याने बँकांनी बचत गटांबरोबरच वैयक्तिक व्यवसायाला कर्ज देऊन लखपती दीदी करण्यासाठी सहकार्य करावे.
बँकांनी पुढाकार घ्यावा
उमेद अभियानामुळे महिला स्वावलंबी झालेल्या आहेत. व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबांना आर्थिक सक्षम केले आहेत. छोट्या व्यवसायाबरोबरच महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमाल परदेशात निर्यात करत आहेत. भविष्यात मोठे व्यवसाय करण्यासाठी बँकांनी कर्ज पुरवठा करून महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी केले.
0 Comments