झालं गेलं गंगेला मिळालं, साहेबांचं नेतृत्व”
अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ; दोन्ही राष्ट्रवादींमधील रेष मिटणार?
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आघाडी करत असल्याने, आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये विलीनीकरण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पिंपरी येथे झालेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी, “मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता वाद नकोत, एकोप्याने काम करायचं आहे. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे,” असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, “मी यशाने हुरळून जाणारा आणि पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहिले पाहिजे, एवढंच माझं ध्येय आहे. या शहरांमध्ये अनेक प्रश्न आहेत, ते सोडवायचे आहेत. अनेक युवा मतदार आहेत, त्यांना योग्य दिशेने न्यायचं आहे.”
मी केवळ प्रचारासाठी येऊन मतं मागणारा नेता नाही, तर सकाळी सहा वाजता उठून लोकांचे प्रश्न समजून घेत त्यावर उपाय शोधणारा कार्यकर्ता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“यावेळी आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र घेतले आहे. आम्हाला भांडण करायचं नाही. केंद्राचं आणि राज्याचं राजकारण महापालिकेत आणायचं नाही. तिथलं राजकारण तिथंच आणि इथलं इथंच ठेवायचं,” असे सांगत अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासालाच प्राधान्य देण्याचा सूर लावला.
बारामती ही आपली जन्मभूमी असली तरी “पिंपरी-चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी या शहराला विसरणार नाही. मी सत्तेत आहे आणि माझ्याकडे अधिकार आहेत तोपर्यंत पिंपरी-चिंचवडचा विकास करत राहीन,” असा शब्द अजित पवार यांनी दिला.
आपली २५ वर्षांची राजकीय कारकीर्द आणि विरोधकांची गेल्या ८–९ वर्षांची कारकीर्द यांची तुलना करत अजित पवार म्हणाले, “आमच्याकडे सत्ता होती, तरीही आम्ही सत्तेचा माज येऊ दिला नाही. सत्तेची मस्ती कधीच अंगात येऊ दिली नाही. अनेक समाजघटकांना प्रतिनिधित्वाची संधी दिली.”
पिंपरी-चिंचवड शहराला देशातील पहिल्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आपल्या विचारांची माणसे विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अजित पवार यांच्या “झालं गेलं गंगेला मिळालं” आणि “साहेबांचं नेतृत्व” या वक्तव्यामुळे, आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील दुरावा कमी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेली ही जवळीक भविष्यात मोठा राजकीय निर्णय घेईल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments