मतदान, मतमोजणी व कायदा-सुव्यवस्था तयारीचा आढावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतमोजणीसाठी करण्यात आलेली नियोजित व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित केली होती.
या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे तसेच पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार सहभागी झाले होते.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत तसेच EVM (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) संदर्भातील तयारी, सुरक्षित साठवणूक, वितरण व्यवस्था, मतदान केंद्रांवरील सुविधा व मतमोजणी केंद्रांवरील नियोजन याबाबत PPT सादरीकरणाद्वारे राज्य निवडणूक आयोगास सविस्तर माहिती दिली. EVM मशीनच्या सुरक्षेसह मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधा आणि मतमोजणी केंद्रांची व्यवस्था नियमांनुसार करण्यात येणार आहे.”तसेच मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांतील पोलीस बंदोबस्त, गस्त, नियंत्रण कक्ष व आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांनी PPT द्वारे माहिती सादर केली.
निवडणूक कालावधीतच शहरात श्री सिद्धरामेश्वर यात्रा आयोजित होत असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान, मतमोजणी प्रक्रिया तसेच यात्रा शांततेत व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मंजूर करण्यात यावा, याबाबत मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे मागणी केली असल्याबाबत मा. पोलीस आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाला सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी “राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेमार्फत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सूचना दिल्या. आगामी निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश आयोगामार्फत देण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपजिल्हाधिकारी, रो.ह.यो.श्रीमती अंजली मरोड,उपजिल्हाधिकारी, भूसंपादनश्री अभिषेक देशमुख,उपविभागीय अधिकारी सोलापूर श्री सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी,श्री भैरप्पा रामू माळी,उपविभागीय अधिकारी,श्रीमती विजया पांगारकर,उपविभागीय अधिकारी श्री सचिन इथापे,उपविभागीय अधिकारी,श्रीमती जयश्री आव्हाडनगर सह. आयुक्त गिरीष पंडित, सह आयुक्त शशिकांत भोसले, अभियंता सारिका अक्कूलवार यांच्या सह अधिकारी उपस्थिती होते.

0 Comments