Hot Posts

6/recent/ticker-posts

कवींनी काळजाला भिडणारे काव्य लेखन करावे – माधव पवार

कवींनी काळजाला भिडणारे काव्य लेखन करावे – माधव पवार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ती कवीच्या अंतःकरणातून उमटली पाहिजे. अशा कविताच रसिकांच्या काळजाला भिडतात. जीवनात आनंदी राहण्यासाठी कोणतीही एक कला आत्मसात करा, संकटांना घाबरू नका तसेच आई-वडील आणि गुरूंना कधीही विसरू नका. काव्य लेखन करताना कवींनी समाजाच्या काळजाला भिडणारे लेखन करावे, असे आवाहन ज्येष्ठ कवी माधव पवार यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या ८५ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे होते.
यावेळी माधव पवार यांनी ‘सांभाळा लेकीच्या जातीला’ ही लावणी तसेच विविध कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना त्यांनी विद्येबरोबरच शील जपण्याचे महत्त्व सांगितले. “मुलींना जपा, कारण मुलीचे अश्रू बापाच्या प्रेतावर पडल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही,” असे भावनिक विधान त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयकुमार उबाळे यांनी ज्येष्ठ कवी रा. ना. पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या २६३ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी साक्षी जिनेंद्र सुराणा (कला व शास्त्र विभाग), कावेरी सिद्राम जोडमोटे (वाणिज्य विभाग), मुग्धा गिरीष मेहता (विधी विभाग) आणि राधा केदार पवार (शिक्षणशास्त्र विभाग) या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचा मानाचा ‘दयानंदश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी यांनी केला, तर अहवाल वाचन प्राचार्या डॉ. एस. जे. गायकवाड यांनी केले. व्यासपीठावर माजी शिक्षणमंत्री डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह रजपूत, राधिका लाहोटी, संस्थेचे सचिव डॉ. महेश चोप्रा, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूरचे जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे प्राचार्य, उपप्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments