Hot Posts

6/recent/ticker-posts

आज मतमोजणी, कोण जिंकणार, कोण हरणार?

 आज मतमोजणी, कोण जिंकणार, कोण हरणार? 




 १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर १०२ नगरसेवकांसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान पार पडले. आता ५६४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. आज (शुक्रवारी) सोलापूर शहरात सात ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. एकूण २६ प्रभागांपैकी प्रभाग १९ आणि २२ मध्ये चार फेऱ्या होतील. प्रभाग २० च्या पाच आणि प्रभाग २६ च्या दोन फेऱ्या असणार आहेत. बाकीच्या सर्व प्रभागांचा निकाल तीन फेऱ्यांमध्ये जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.

सोलापूर महापालिकेच्या २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी मतदान पार पडले. आता शहराच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, याचा तर्कविर्तक लढविला जात आहे. प्रत्येक उमेदवाराने आपणच विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सोलापूर शहरातील ३५३ इमारतींमधील १०९१ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. दुपारी उन्हाचा त्रास टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदारांनी सकाळच्या सत्रातच मतदान केले. बहुतांश उमेदवारांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले.

सोलापूर शहरातील ९ लाख २४ हजार ७०६ मतदारांपैकी निम्म्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष देत काही दिवस सोलापुरातच मुक्काम ठोकला होता. त्यांच्यासमवेत आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे यांनी शहरातील बहुतेक प्रभागात जाऊन सभा, रॅली काढल्या. विरोधकांनीही त्यांच्या पद्धतीने प्रचार केला. आता निकालाची उत्सुकता शिगेला पोचली असून कोणता उमेदवार पडणार आणि कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शहरातील आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख व आमदार देवेंद्र कोठे यांच्या विधानसभा मतदारसंघातील किती जागा भाजप जिंकणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सात ठिकाणी प्रभागनिहायनिकाल

- सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सात ठिकाणी मतमोजणी होणार

- सकाळी १० वाजता सुरवातीला पोस्टल मतमोजणी होईल

- सकाळी ११ वाजता प्रभागनिहाय मोजणीला प्रारंभ होणार आहे

- अ, ब, क, ड अशा चारही उमेदवारांची एकाचवेळी मतमोजणी होईल

- तीन फेऱ्यांमध्ये संपूर्ण १०२ जागांचा निकाल हाती येणार

- प्रत्येक फेरीसाठी किमान एक तासाचा अवधी लागेल

- दुपारी दोनपर्यंत निकाल स्पष्ट होणार
Reactions

Post a Comment

0 Comments