Hot Posts

6/recent/ticker-posts

मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात

 मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात




 सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजपासाठी महत्त्वाच्या असलेल्या सोलापूर महापालिकेसाठी मतदान पार पडत असतानाच स्थानिक नाराजी समोर आली आहे. भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांना पक्षाबद्दलची नाराजी लपवता आली नाही. 'मी साधा माणूस आहे.

मला राजकारणातील काही कळत नाही', म्हणत देशमुखांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

आमदार सुभाष देशमुख यांची पक्ष आणि पालकमंत्र्यांबद्दलची नाराजी अजूनही कायम आहे. सोलापूर महापालिकेसाठी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाला सुनावले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आमदार दिसले नाही, याबद्दल त्यांना विचारण्यात आले. सुभाष देशमुख म्हणाले, "आम्ही दोन आमदारांनी गेल्या वेळी ४९ जागा जिंकून महापालिका आणली होती. आता तर पक्षाचे तीन आमदार आहेत. त्यामुळे यापेक्षा जास्त जागा जिंकून यायला पाहिजे", असा टोला त्यांनी लगावला.

महापालिका निवडणुकीत महायुती झाली असती, तर याचा मोठा फायदा झाला असता का? असा प्रश्नही सुभाष देशमुख यांना विचारण्यात आला.

मला काही कळत नाही

सुभाष देशमुख यांनी खोचक शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, "हे सर्व निर्णय वरचे घेतात. मला यातील काही कळत नाही. मैत्रिपूर्ण लढायचे म्हणतात आणि टीका करायची नाही म्हणतात. मी आपला सामान्य माणूस असल्याने हे राजकारण मला काही कळत नाही", अशा शब्दात त्यांनी भाजपाच्या नेतृत्वालाही सुनावले.

आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार दिलीप माने यांना भाजपात घेऊ नये अशी भूमिका होती. पण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना भाजपामध्ये आणले. त्याचबरोबर देशमुख समर्थकांची तिकिटेही कापण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले देशमुख हे महापालिकेच्या प्रचारापासून दूर राहिले.

Reactions

Post a Comment

0 Comments