सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाअगोदर मंगळवारी प्रचार १० दिवसांच्या थकबाकी नंतर सायंकाळी संपला. मात्र राज्य निवडणूक आयोगाने मकरसंक्रांतीच्या दिवशी उमेदवारांना मतदारांना घरोघरी भेटण्याची मुभा दिल्यामुळे बुधवारी सर्व उमेदवार आश्वासनांचे ‘वाण’ लुटण्याचा प्रयत्न करतील.
महापालिकेच्या १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चार सदस्यीय प्रभागात सुमारे ३५ ते ४५ हजार मतदार असल्यामुळे उमेदवारांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. प्रचार संपल्यानंतर पोलिस प्रशासनही सतर्क झाले असून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी आणि ५० हजारांहून अधिक रोकड व मद्य बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी शिंदेसेना व एमआयएमच्या पदयात्रा आमने-सामने आल्या. जगदंबा चौकात दोन्ही पक्षांचे नेते आणि उमेदवार हात जोडून नमस्कार करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे यांसह शहरातील प्रमुख नेते सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होते. यामुळे भाजपच्या पदयात्रांवर काही प्रमाणात परिणाम झाला; मात्र भाजपकडून ‘होम टू होम’ प्रचाराचे नियोजन सुरू होते.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एमआयएम आणि शिंदेसेना यांनीही आपल्या उमेदवारांसाठी मोठ्या पदयात्रा काढल्या. एमआयएम हैदराबादहून आलेल्या नेत्यांसह प्रभागांमध्ये उमेदवारांना बळ देत होते, तर शिंदेसेनेच्या अमोल शिंदे आणि सुरेश पाटील यांच्या पदयात्रांमध्ये कार्यकर्ते व महिलांचा मोठा सहभाग होता.
गुन्हेगार ११३ उमेदवारांना मतदानासाठी तडीपार करणे, शहराबाहेरील नेत्यांना प्रचारासाठी परत पाठवणे आणि अक्षता सोहळा यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काही बदल घडले, तरी उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु ठेवला.
सर्व पक्षांकडून अंतिम तयारी पूर्ण असून, मकरसंक्रांतीच्या दिवशी उमेदवारांचा ‘घरोघरी भेटी’ अभियान महापालिकेच्या मतदानाची पर्वणी ठरणार आहे.
0 Comments