दुधनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार
दुधनी / मैंदर्गी (कटूसत्य वृत्त) : दुधनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार प्रथमेश शंकरराव म्हेत्रे यांनी मंगळवारी स्वीकारला. त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदासाठी जिलानी चाँदसाब नाकेदार यांची एकमताने निवड करण्यात आली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी नगराध्यक्ष पदाचे पत्र सुपूर्द केले. यावेळी नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी नागरिकांना पाणी, रस्ते, दिवाबत्ती यासह दिलेल्या आश्वासनांचे पालन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शंकरराव म्हेत्रेंच्या नियोजनाने नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक निवडून आल्याने दुधनी नगरपरिषदेवर भगवा फडकविण्याचा ऐतिहासिक विजय मिळाला. याआधी येथे सरसकट उमेदवार निवडून आले नव्हते.
उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे जिलानी नाकेदार यांचे पदावर नाव जाहीर करण्यात आले. तसेच दोन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली, ज्यामध्ये बसवराज रायप्पा हौदे व उदयकुमार मल्लिनाथ म्हेत्रे यांचा समावेश आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सर्व नगरसेवकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
शिवसेना नेते शंकरराव म्हेत्रे म्हणाले, “दुधनीतील नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासावर अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकविला जाईल. मुस्लिम समाजास न्याय देण्यासाठी उपनगराध्यक्षपदावर जिलानी चाँदसाब नाकेदार यांची निवड करण्यात आली.”
0 Comments