मधला मारुती व बुधवार पेठेतील धार्मिकस्थळांचे सुशोभीकरण करणार- सुशील बंदपट्टे
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांनी मंगळवारी बुधवार पेठ व परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत सुशील बंदपट्टे यांच्यासह उमेदवार कविता आनंद चंदनशिवे, सारिका फुटाणे, विश्वनाथ बिडवे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सुशील बंदपट्टे म्हणाले, प्रभागात मधला मारुती, उत्तरमुखी व दक्षिणमुखी मारुती मंदिरे, शिवगंगा देवी मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर यासह अनेक धार्मिकस्थळे आहेत. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा-अर्चा करतात. मात्र, या मंदिरांच्या सुशोभीकरणाकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा नियोजन समिती तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला जाईल. ही कामे करताना स्थानिक भक्त, नागरिक व सामाजिक संस्थांना विश्वासात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच या भागातील आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा प्रश्न कायमच चर्चेत असून, त्यावर ठोस उपाययोजना केल्या जातील, असा शब्दही त्यांनी दिला.पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सफाई कामगारांना पक्की घरे देणारच – कविता चंदनशिवे
यावेळी उमेदवार कविता आनंद चंदनशिवे म्हणाल्या की, महापालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत जीर्ण झाली असून, त्यांना पक्की घरे मिळालीच पाहिजेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. बागले वस्ती, मुकुंदनगर, राजीव गांधीनगर परिसरात रमाई आवास योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

0 Comments